स्थायी समितीच्या बैठकीत सादर केलेल्या विविध कामांच्या सात प्रस्तावांमध्ये महापौरांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल मनसेने प्रशासनावर तोफ डागली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक थंडच बसून होते. स्थायी समिती अध्यक्षांनी केवळ ‘प्रशासनाने नोंद घ्यावी’ इतकेच वक्तव्य करत या मुद्दय़ाला बगल दिली.
पाच लाख रुपयांहून अधिक आणि ७५ लाख रुपयांहून कमी खर्चाच्या विविध कामांचे सात प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केले होते. अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सदस्यांची मंजुरी घेण्यासाठी हे प्रस्ताव पुकारताच मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापौर हा मुंबईचा प्रथम नागरिक असून प्रशासनाने त्यांच्याबद्दल आदर बाळगायला हवा. प्रशासनाने सादर केलेल्या सात प्रस्तावांमध्ये त्यांचा ‘महापौराने’ असा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्दय़ामुळे बैठकीत गोंधळ होईल असे वाटले होते. स्थायी समिती अध्यक्षांच्या दहशतीमुळे शिवसेना नगरसेवकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. प्रशासनाला समज देण्याऐवजी राहुल शेवाळे यांनी केवळ ‘प्रशासनाने नोंद घ्यावी’ असे सांगत या मुद्दय़ावर पडदा टाकला.

Story img Loader