मुंबई: म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाप्रमाणे आता म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर आणि अमरावती मंडळाचा कारभारही ऑनलाईन करण्यात आला आहे. सोमवारी या विभागीय मंडळांच्या विविध वसाहतीतील भाडेकरूंना सेवाशुल्क आणि इतर देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता यावा यासाठी ई-बिलिंग संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रणालीच्या सेवेचा प्रारंभ सोमवारी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.
मागील काही वर्षांपासून म्हाडाने आपला कारभार संगणकीयकृत करण्याकडे कल वाढवला आहे. त्यामुळेच आता म्हाडाची सोडत पूर्णत ऑनलाईन झाली आहे. मुंबई मंडळाचा कारभारही ऑनलाईन असून ई-बिलिंग सेवेमुळे रहिवाशांचे म्हाडातील हेलपाटे वाचत आहेत. या पार्श्वभूमीवर आता इतर मंडळातही ई-बिलिंग सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोकण, पुणे, नागपुर आणि अमरावती मंडळासाठी ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मंडळातील रहिवाशांना घरबसल्या आँनलाईन सेवाशुल्क आणि इतर देयकांचा भरणा करता येणार आहे.