कापडी पिशव्या बनवण्यासाठी मदत करण्याचे पालिकेचे आवाहन

पालिकेच्या ९२ मंडयांमधून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून महिला बचत गटांच्या माध्यमातून या ठिकाणी कापडी पिशव्या उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस आहे. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या महिला बचत गटांना भांडवलासाठी मदत करू शकणारे दानशूर अथवा कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी निधी मिळतो का, याची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. अद्याप कंपनी, सामाजिक संस्था अथवा दानशूर पुढे आलेले नाहीत. मात्र लवकरच ही मंडळी पुढे येतील आणि आर्थिक रसद मिळून महिला बचत गटांच्या कापड व कागदाच्या पिशव्या मंडईपर्यंत पोहोचतील, असा आशावाद पालिकेला आहे.

मुंबईमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा पातळ पिशव्यांना बंदी घालण्यात आली असली तरी, या पिशव्या सर्रासपणे वापरात आहेत. पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी लादतानाच दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात आली. मात्र ही कारवाई आजही परिणामकारक होताना दिसत नाही. मंडया, बाजारपेठांसह अनेक ठिकाणी दुकानदार, फेरीवाले वापरास बंदी असलेल्या पातळ पिशव्या ग्राहकांना देत असल्याचे निदर्शनास येते. मात्र कारवाई होत नसल्याने या पिशव्यांचा वापर सर्रास सुरूच आहे. या पाश्र्वभूमीवर आता पालिकेनेच प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्यासाठी पावले उचलली आहेत. दुकानदारांनी कापडी अथवा कागदाच्या पिशव्यांची विक्री करावी. मंडयांमध्ये कापडी अथवा कागदी पिशव्यांचा महिला बचत गटांच्या माध्यमातून पुरवठा करता यावा यादृष्टीने पालिकेने चाचपणी सुरू केली आहे.

‘प्रदूषणकारी प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा वापर नागरिकांनीच स्वत:हून बंद करायला हवा. बाजारात जाताना नागरिकांनी सोबत कापडी पिशवी घेऊन जायला हवे. मात्र नागरिक वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदारांकडे प्लास्टिकच्या पिशव्यांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आता पालिकेच्या ९२ मंडयांमधून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे,’ अशी माहिती उपायुक्त निधी चौधरी यांनी दिली.

काही महिला एकत्र येऊन महिला बचत गट स्थापन केला जातो. त्यामुळे या महिला बचत गटांकडे निधीची प्रचंड चणचण आहे. अशा गटांना दानशूर किंवा कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी निधीद्वारे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. खेळते भांडवल मिळाल्यास महिला बचत गट स्वत:च्या पायावर उभे राहू शकेल आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या कापडी पिशव्यांमुळे मंडयांमधून प्लास्टिक हद्दपार करणे सहज शक्य होईल, असे त्या म्हणाल्या.

स्वच्छता मोहिमेमध्ये मुंबईतील कचरा कमी व्हावा यावर भर दिला जात आहे. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत. या प्रदूषणाच्या दृष्टीने प्लास्टिकच्या पिशव्या अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळे पुनर्वापर करता यावा अशा कापडी पिशव्यांचा वापर मुंबईकरांनी केला तर आपोआप प्लास्टिकच्या पिशव्या मुंबईतून हद्दपार होतील. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त