पालकांची आर्थिक स्थिती, रखडलेले निकाल यांचा परिणाम

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : पालकांची खालावलेली आर्थिक स्थिती, ऑनलाइन शिक्षणातील विविध अडचणी, शालांत परीक्षांचे रखडलेले निकाल इत्यादी कारणांमुळे यंदा खासगी शिकवणी वर्गाचे प्रवेश घटले आहेत. तसेच ऑनलाइन शिक्षणामध्ये एरव्हीपेक्षा कमी शिक्षकांची गरज असल्याने शिक्षकांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. सद्य:परिस्थितीचा सर्वागाने विचार करून काही शिकवणी वर्गानी शुल्क कमी के ले आहे. यात लहान शिकवणी वर्गाची संख्या लक्षणीय आहे.

शाळेव्यतिरिक्त अतिरिक्त मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि शालांत परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण प्राप्त करण्यासाठी खासगी शिकवणी वर्गात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. शालांत परीक्षांचे शिकवणी वर्ग तर उन्हाळी सुट्टय़ांमध्येही चालतात. मात्र, टाळेबंदीमुळे गेले काही महिने शिकवणी वर्ग बंद होते. या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी काहींनी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात क रत आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आश्वस्त के ले. मात्र त्यांना नव्या प्रवेशांना मुकावे लागले आहे. शिकवणी वर्ग शाळा-महाविद्यालयांवर अवलंबून असतात. सध्या दहावी-बारावीचे निकाल न लागल्याने अकरावी आणि प्रथम वर्ष पदवी वर्षांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत.

‘काही पालकांना शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रवेश घ्यायचा असतो. ते शक्य न झाल्याने वसई-विरारच्या शाखांमधील प्रवेश सर्वाधिक घटले आहेत. १५ जूनला क्लास उघडल्यानंतर काही पालक प्रवेशासाठी आले. सध्या पालकांना पगार कपातीला सामोरे जावे लागले आहे. शिवाय शिक्षण ऑनलाइन सुरू असल्याने क्लासच्या विजेचा खर्चही वाचतो आहे. त्यामुळे यंदा शुल्कात ३० टक्के  कपात के ली आहे’, असे सायन्स परिवार क्लासेसचे सुभाष जोशी सांगतात.

‘दहावी-बारावीचे ५० टक्के  प्रवेश आदल्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान होतात. उर्वरित प्रवेश शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला होतात. मात्र, यंदा अनेक विद्यार्थी टाळेबंदीमुळे गावीच अडकले. ऑनलाइन शिक्षणात सहभागी होता येणार नसल्यानेही काहींनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे आठवी ते बारावीच्या अपेक्षित ७०० प्रवेशांपैकी चारशेच प्रवेश अद्याप झाले आहेत’, असे सरस्वती कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापन सदस्य शैलेश पिंपळे सांगतात. पालकांच्या आर्थिक स्थितीचा आणि क्लास बंद असल्याने वाचणाऱ्या विजेच्या खर्चाचा विचार करून सरस्वती क्लासेसनी आपले शुल्क २० टक्क्यांनी कमी के ले आहे. शिवाय शुल्काचे हप्ते वाढवले आहेत. ऑनलाइन शिक्षणामध्ये एकपेक्षा अधिक तुकडय़ांना एकाच तासिके त सामावून घेता येत असल्याने शिक्षकांना तासिका कमी मिळत आहेत. येथे शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार तासिकांवर अवलंबून असतो. त्यात कपात झाली आहे.

शिक्षकांचे काम सुरू असल्याने त्यांचा पगार सुरू आहे. मात्र, इतर कर्मचाऱ्यांचे काम सुरू नसतानाही पगार द्यावाच लागत आहे. काहींना जागेचे भाडेही भरावे लागत आहे. टाळेबंदी संपल्यानंतरही शारीरिक अंतराच्या नियमामुळे कमी विद्यार्थ्यांच्या तुकडय़ा करून वर्ग भरवावे लागतील. त्यामुळे शिक्षकांना दोनदा पगार द्यावा लागेल.

– संतोष वासकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन.

Story img Loader