लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यात प्रथमच नव्याने सुरू करण्यात आलेल्या ॲक्युपंक्चर महाविद्यालयांमधील वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले आहेत. मात्र विलंबाने प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने काही महाविद्यालयांमध्ये अद्याप सर्व जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे अधिकाधिक जागांवर प्रवेश व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने या सर्व महाविद्यालयांमध्ये २० डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमाला विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असेही परिषदेने स्पष्ट केले आहे.

राज्यामध्ये ॲक्युपंक्चर अभ्यासक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे आणि नागरिकांना उत्तम व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने राज्यात नवीन ॲक्युपंक्चर महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये ५० जागांना मान्यता दिली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये १ डिसेंबरपासून वर्ग सुरू झाले आहेत. यापैकी अनेक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र मान्यता मिळण्यास झालेला विलंब, आचारसंहितेमुळे जाहिराती करण्यात आलेल्या अडचणी, प्रवेश प्रक्रियेसाठी मिळालेला कमी वेळ यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने घेतला आहे. या अभ्यासक्रमासाठी १२ वीच्या परीक्षेत ४० गुण मिळून उत्तीर्ण झालेले विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, अशी माहिती महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी दिली.

आणखी वाचा-कलाकार कोट्यातील म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून फसवणूक

राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जालना, बुलढाणा, जळगाव, भंडारा, नागपूर, वाशिम, अहमदनगर, परभणी, अकोला, लातूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ॲक्युपंक्चर महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांमध्ये मराठी व इंग्रजी या दोन माध्यमातून अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.

किती आहे शुल्क

महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. प्रती वर्ष ७५ हजार रुपये असे दोन वर्षांसाठी एकूण १ लाख ५० हजार रुपये शुल्क आकारण्यात आल्याचे नारायण नवले यांनी सांगितले.

आणखी वाचा-Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “युक्रेनचं युद्ध मोदींनी जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेशात…

विद्यार्थ्यांना असलेल्या संधी

ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी नोंदणीकृत ॲक्युपंक्चर रोगनिवारणतज्ज्ञ म्हणून काम करू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार ही तज्ज्ञ व्यक्ती २२० आजारांवर उपचार करू शकते. यामध्ये मानसिक आजार, अस्थिव्यंग आजार, स्नायूंना दुखापत, वेदना आणि मज्जातंतूंशी संबंधित विविध आजारांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे स्वतंत्र क्लिनिक सुरू करता येणार आहे. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधीही त्यांना उपलब्ध होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission process for acupuncture course till december 20 mumbai print news mrj