मुंबई : राज्य सामाईक प्रवेश प्ररीक्षा कक्षाकडून कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाल्यानंतर आता एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस ६ जुलैपासून सुरूवात करण्यात आली. या अभ्यासक्रमाची सीईटी ३८ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी दिली होती. या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित संस्था, विद्यापीठ व्यवस्थापित विभाग आणि विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (एमसीए) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) ६ जुलैपासून सुरूवात करण्यात आली आहे.
हेही वाचा…आषाढी वारीसाठी ३,८० लाख रुपयांची औषध खरेदी, स्थानिक स्तरावर तातडीने खरेदी करण्यास मान्यता
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जुलै रोजी यासायंकाळी ५ वाजेपर्यंत http://www.mahacet.org या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी व कागदपत्रे ऑनलाईन सादर करता येणार आहेत. या कागदपत्रांची १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे. अंतरिम यादी १७ जुलै रोजी जाहीर होईल, त्यासंदर्भातील तक्रारी १८ ते २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदवता येणार आहेत. त्यानंतर २२ जुलै रोजी अंतिम यादी जाहीर होईल. या परीक्षेसाठी ३९ हजार ९२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३८ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती.
हेही वाचा…केईएम रुग्णालयातील रुग्ण अहवाल कागदी आवरण दुरूपयोग प्रकरणी चौकशी
अनिवासी भारतीय, भारतीय वंशाची व्यक्ती, परदेशी नागरिकत्व घेतलेली भारतीय वंशाची व्यक्ती, परदेशी नागरिक यांना प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्ज करण्यासाठी १० हजार रुपये इतके शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरील, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश, लडाख केंद्रशासित प्रदेशातील सामान्य श्रेणीतील उमेदवार आणि आखाती देशांमधील भारतीय कामगारांची मुले यांना १२०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.