लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्या शाळांसाठी जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. नर्सरीच्या तब्बल १२४२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सीबीएसईच्या शाळांची संख्या गेल्या वर्षभरात वाढवण्यात आली असून सध्या मुंबईत पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या १८ शाळा सुरू आहेत. चारही मंडळाच्या मिळून २१ शाळांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
मुंबईत सन २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगरमध्ये मुंबई पब्लिक स्कूल (पालिकेची शाळा)मध्ये सीबीएसईची पहिली शाळा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या या शाळेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पालिकेने अन्य ठिकाणीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा सुरू केल्या. पालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई यांच्याशी संलग्न प्रत्येकी एक शाळा सुरू करण्यात आली. या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर पालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाचीही एकएक तुकडी वाढवली होती. पालिकेच्या केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या या शाळांचे प्रवेश हे आलेल्या अर्जांची सोडत काढून जाहीर करण्यात येतात. अन्य मंडळांच्या खासगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांना मोठा प्रतिसाद असतो.
आणखी वाचा-गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरण : ७३ वर्षांच्या दोषसिद्ध आरोपीला जामीन नाहीच
सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ४० विद्यार्थी इतकी आहे. आयबी मंडळाच्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची पटसंख्या ३० आहे. महापौरांच्या स्वेच्छाधिकाराच्या १० टक्के जागा राखीव असतात. तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात येतत. त्यातून उर्वरित जागांवर सोडत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार सीबीएसई, आयसीएसई व केंब्रीज मंडळाच्या शाळांमध्ये दोन तुकड्या आहेत. या सर्व शाळांमधील १२४२ जागांसाठी १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
सीबीएसईच्या शाळांची संख्या १८
भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतिक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कु र्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व), मुंबई पब्लिक स्कूल, आणिक गाव, जिजामाता नगर, (चेंबूर पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी क्रॉस रोड, साईनगर (कांदिवली पश्चिम), मुबई पब्लिक स्कूल, आशिष तलाव, वडवली, आरसीएफ, (चेंबूर), चिकुवाडी (बोरिवली), पूनमनगर