मुंबई : अनेक शैक्षणिक संस्थांना भारतीय औषधनिर्माण परिषदेची (फार्मसी काैन्सिल ऑफ इंडिया) मंजुरी न मिळाल्याने रखडलेले औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर राज्य सामाईक प्रवेश प्ररीक्षा कक्षाने सुरू केली. या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, २७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांना भारतीय औषधनिर्माण परिषदेकडून वार्षिक मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील बहुतांश संस्थांनी यासाठी आवश्यक असलेली नोंदणी प्रक्रिया विलंबाने केली. त्यामुळे औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांनी परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविलेले प्रस्ताव प्रलंबित होते. या प्रस्तावांना मान्यता मिळाल्याशिवाय औषधनिर्माण शास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षाला शक्य नव्हते. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची आवश्यक नोंदणी प्रक्रियाही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पूर्ण करण्यात आली होती. मात्र संस्थांच्या प्रस्तावावरील मंजुरी रखडल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती. यामुळे विद्यार्थी व पालक चिंतीत होते. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थ्यांनी उपलब्ध जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची विनंती सीईटी कक्षाला केली होती.

हेही वाचा >>>मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा मोर्चा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी २४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. मात्र अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रस्तावांना भारतीय औषधनिर्माण परिषदेकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. अखेर ४ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी व उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात आला. त्यानंतर ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध करण्यात आली. त्यानुसार औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या ३६ हजार ७४७ जागांसाठी नोंदणी केलेल्या ५० हजार ११७ विद्यार्थ्यांपैकी ३७ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम भरला. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६१ विद्यार्थ्यांना जागा जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले.

हेही वाचा >>>Ratan Tata : रतन टाटांना अखेरचा निरोप देताना भाऊ जिमी टाटांना अश्रू अनावर, सावलीसारखा भाऊ हरपल्याचं मनात दुःख

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक

प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे – ११ ते १४ ऑक्टोबर

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर – १५ ऑक्टोबर

दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरणे – १६ ते १८ ऑक्टोबर

अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर – २१ ऑक्टोबर

प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे – २२ ते २४ ऑक्टोबर

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर – २५ ऑक्टोबर

तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरणे – २६ ते २८ ऑक्टोबर

अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर – ३० ऑक्टोबर

प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे – ४ ते ६ नोव्हेंबर

संस्थात्मक फेरी – ९ ते ११ नोव्हेंबर

प्रवेशाची अंतिम मुदत – १४ नोव्हेंबर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission process for pharmacy course begins mumbai print news amy