मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयातील आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखिल भारतीय व राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी २६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
‘अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२४’ला बसलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवीसाठी अखिल भारतीय व राज्य कोट्यातून प्रवेश दिला जातो. एकूण जागेच्या १५ टक्के जागांवरील प्रवेश हे अखिल भारतीय कोट्यातून केले जातात. उर्वरित प्रवेश राज्य कोट्यातून केले जातात. अखिल भारतीय कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे अधिकार सीईटी कक्षाला दिले आहेत. या दोन्ही कोट्यातील प्रवेशासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील सरकारी, खासगी अनुदानित, विनाअनुदानित खाजगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयातील जागांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी कक्षाने प्रवेशासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाच्या www. mahacet.org या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. तसेच २२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश शुल्क, आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. अंतरिम गुणवत्ता यादी २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. राज्य कोट्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील २३ सप्टेंबर रोजीच जाहीर करण्यात येणार आहे. २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी २६ सप्टेंबर रोजी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
हेही वाचा – मुंबई : आमचा प्रश्न… कामातील चुकांमुळे मोटरमनला सक्तीच्या निवृत्तीची शिक्षा ?
अखिल भारतीय आयुष अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी करता येणार आहे. अंतरिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. राज्य कोट्यांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याने राज्य कोट्यातील उपलब्ध जागांचा तपशील आणि अखिल भारतीय आयुष कोट्यासाठी उपलब्ध जागांचा तपशील ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी १४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. राज्य कोट्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशाचा तपशील सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd