मुंबई : भारतीय औषधनिर्माण परिषदेच्या आदेशानुसार पदवी व पदव्युत्तर पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महाविद्यालयांचा समावेश न होताच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतला. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने त्याची दखल घेत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाल्यानंतर दोन फेऱ्यांनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक व महाविद्यालये अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय औषधनिर्माण परिषदेने प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शासन निर्णय जाहीर करण्याची विनंती २१ ऑक्टोबर रोजीच्या पत्रान्वये करत काही महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर सद्य:स्थितीत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून कळविण्यात आले आहे. तसेच पुढील प्रक्रियेबाबतची सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याअनुषंगाने उमेदवार व संस्थांनी नियमितपणे कार्यालयीन संकेतस्थळाला भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा…परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
u
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यातील ४९७ महाविद्यालयांमधील ४६ हजार ५१२ जागांसाठी ५० हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत दोन फेऱ्या पार पडल्या असून, या दोन फेऱ्यांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, तर २४ हजार ५५१ जागा रिक्त आहेत.
यंदा विद्यापीठांची संलग्नता आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळवण्यास उशीर झाल्यामुळे महाविद्यालयांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे नोंदणी करण्यास विलंब झाला. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने देखील प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू केली. प्रवेश प्रक्रिया उशीराने सुरू झाल्याने औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच दोन फेऱ्या झाल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा पुन्हा प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.