मुंबई : अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर आटपावी यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी रद्द करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला. मात्र आता चौथ्या विशेष प्रवेश फेरीनंतरही विद्यार्थी प्रवेशाविना आणि दुसरीकडे लाखो रिक्त जागा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता दैनंदिन फेऱ्या घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यामुळे यंदाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन महाविद्यालये सुरळीत सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता आहे.

अकरावी प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ‘एफसीएफएस’ ही फेरी घेण्यात येत होती. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर शेवटच्या टप्प्यांत घेण्यात येणाऱ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा ही फेरी रद्द करून दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फेरीमध्ये पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. तसेच दैनंदिन गुणवत्ता फेरीमुळे अल्पसंख्यांक व नामांकित महाविद्यालयांत प्रवेशादरम्यान गैरप्रकार होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई : …अखेर जोग पुलाची दुरुस्ती होणार, उड्डाणपुलाचा ९५ कोटींचा खर्च पालिका करणार, एमएमआरडीएकडून पैसे वसूल करणार

हेही वाचा – मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ

अकरावी प्रवेशाच्या चौथ्या विशेष प्रवेश फेरीअखेर मुंबई महानगर क्षेत्रातील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणारे जवळपास ३४ हजार २१४ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच चौथ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अद्यापही प्रवेशापासून वंचित असलेले नियमित विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी मिळण्यासाठी पाचवी विशेष प्रवेश फेरी आणि त्यानंतर दैनंदिन गुणवत्ता फेरी घेण्यात येणार आहे. अकरावीची पाचवी विशेष प्रवेश यादी ही मंगळवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.