लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल)अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन आयडीमधून प्रवेशपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही परीक्षा संगणक आधारित पद्धतीने (ऑनलाइन) आणि दोन सत्रांमध्ये होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून http://www.cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन आयडीमधून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

प्रवेशपत्र कसे डाऊनलोड कराल ?

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला http://www.cetcell.mahacet.org भेट द्यावी. त्यानंतर मुखपृष्ठावर दिलेल्या सीईटी प्रवेश लॉगिन या दुव्यावर क्लिक करावे. पुढील पानावर आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड द्यावा. त्यानंतर ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करून प्रवेशपत्र पाहता व डाउनलोड करता येईल. त्याची छापील प्रत (प्रिंट) काढून परीक्षा दिवशी सोबत नेणे बंधनकारक आहे.

परीक्षेच्या दिवशी ही कागदपत्रे आवश्यक

परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रवेशपत्राची छापील प्रत, ओळखीचा वैध पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक) आणि शक्य असल्यास हॉल तिकिटावर लावलेला अलीकडील पासपोर्ट आकाराचा छायाचित्र (फोटो) बरोबर असावा. उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचावे आणि सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन सीईटी कक्षामार्फत करण्यात आले आहे.