शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीदिनी मोठा गाजावाजा करीत जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ मुंबई अभियाना’त असंख्य त्रुटी असल्यामुळे ही योजना लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नाकारलेल्या दत्तकवस्ती योजनेला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपवर ओढवली.
दत्तकवस्ती योजनेतील संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित करून नगरसेवकांनी या योजनेलाच विरोध केला होता. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मुंबईत स्वच्छता राखली जावी यासाठी प्रशासनाने ‘स्वच्छ मुंबई अभियान’ नावाने नवी योजना आखली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या जयंतीदिनी महापौर बंगल्यामध्ये आयोजित समारंभात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या योजनेची घोषणा केली.
मात्र १ फेब्रुवारीपासून अंमलात येणाऱ्या या योजनेत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता ही योजनाच अडचणीत आली आहे. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पूर्वीच्या दत्तकवस्ती योजनेला १ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत दोन महिन्यांची मदतवाढ देण्यात आली आहे.
 प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला होता. परंतु याबाबत चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.