मुंबई : सणासुदीच्या काळात मुंबईत अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष मोहिमेतून उघडकीस आले आहे. ‘एफडीए’ने मुंबईमधून चार लाख ८४ हजार ८२२ रुपये किंमतीचे खाद्यतेल, तर दोन लाख २० हजार ६६० रुपये किंमतीचे चॉकलेट आणि चहा पूड जप्त केली. विविध अन्नपदार्थांचे एकूण ९३ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
दरवर्षीप्रमाणे एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाच्या आस्थापनाविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत मिठाईचे ५१, नमकीनचे ६, खाद्यतेलाचे ७, तुपाचे १० आणि इतर अन्नपदार्थांचे २२ असे एकूण ९६ नमूने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान संशयावरून एफडीएने २,११२.५५ किलो आणि चार लाख ८४ लाख ८२२ रुपये किंमतीचे खाद्यतेल जप्त केले. तसेच दोन लाख २० हजार ६६० रुपये किंमतीचे १,२५६ किलो चॉकलेट, तसेच चहा पूड जप्त केली. सणासुदीच्या काळातील ही विशेष मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान सणासुदीला अन्नपदार्थांमधील भेसळ वाढत असल्याने ग्राहकांनी अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी आणि संशयास्पद आढळल्यास त्वरित ‘एफडीए’कडे तक्रार करावी, असे आवाहन केकरे यांनी केले.