मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई बॉम्बस्फोट व दहशतावादी हल्ला अशा खटल्यांमध्ये बाजू मांडल्याने राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी अशी निकम यांची प्रतिमा भाजपकडून निर्माण करण्यात येत आहे.
विलेपार्ले, वांद्रे पूर्व आणि पश्चिम, चांदिवली, कलिना व कुर्ला अशा पसरलेल्या उत्तर मध्य मुंबईतून भाजपने अॅड. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ गेले महिनाभर सुरू होता. भाजपच्या राज्यातील पहिल्या यादीत पूनम महाजन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. तेव्हाच महाजन यांना उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले होते. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून पूनम महाजन यांनी प्रचार थांबविला होता. तसेच पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहण्याचे टाळले होते. यावरून पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी पुरेसा संपर्क नसणे आदी बाबींमुळे भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही, असे सांगण्यात येते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा होती, पण त्यांची दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. पक्षाने चित्रपट क्षेत्रातील नामवंतांकडे विचारणा केली होती. शेवटी अॅड. निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>शिवशक्ती-भीमशक्तीचा मुंबईत नव्याने प्रयोग; वर्षां गायकवाड यांच्या उमेदवारीने संकेत
प्रतिमेचा वापर करण्याचा प्रयत्न
या मतदारसंघात आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होईल. माजी मंत्री वर्षां गायकवाड या कसलेल्या राजकारणी आहेत. या तुलनेत निकम हे नवखे आहेत. मूळचे जळगावचे असलेले निकम यांचा उत्तर मध्य मुंबईशी फारसा संबंध नाही. निकम हे भाजपचे कधीच सक्रिय कार्यकर्ते नव्हते. तरीही त्यांच्या प्रतिमेचा वापर करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईत पियूष गोयल आणि मिहिर कोटेचा हे दोघे अमराठी उमेदवार असल्याने भाजपने निकम हा मराठी चेहरा िरगणात उतरविला आहे.
हेही वाचा >>>निवडणुकीतील मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय
निकम का ?
भाजपमध्ये सक्रिय नसलेल्या किंवा आतापर्यंत पक्षात कोणतीही भूमिका न बजाविलेल्या उज्ज्वल निकम यांना थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत निकम यांचा पक्षात अधिकृतपणे प्रवेशही झाला नव्हता. निकम हे प्रख्यात वकील आहेत. मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला, १९९३मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिका, खैरलांजी व सोनई हत्याकांड अशा विविध गुन्ह्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती व त्यात आरोपींनी फाशीची शिक्षा झाली होती. बॉम्बस्फोट खटल्यातूनच निकम हे प्रसिद्धीस आले होते. यातूनच निकम यांची राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा भाजपकडून निर्माण केली जात आहे. विलेपार्ले, वांद्रे, कलिना अशा भागांत निकम यांना चांगला पािठबा मिळेल, असे भाजपचे गणित आहे.
मुंबईतील तिन्ही खासदारांना घरी बसविले
गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक या मुंबईतील तिन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारून खासदारांच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू नये, अशी खबरदारी भाजपने घेतली आहे. शेट्टी आणि कोटक यांना पहिल्याच यादीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. उत्तर मध्य मुंबईत उमेदवारावरून खल बरेच दिवस सुरू होता. यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब लागला आहे.