Ujjwal Nikam reaction on Baba Siddique: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. तीन टर्म आमदार आणि मंत्री राहिलेल्या एका महत्त्वाच्या आणि अल्पसंख्याक नेत्यावर अशाप्रकारे हल्ला झाल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. यावर आता सरकारी वकील आणि उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक लढविणारे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी या घटनेचा निषेध करतो. बाबा सिद्दीका यांना घटनेच्या काही दिवस आधी धमकी मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी त्यांना संरक्षणही देऊ केले होते. मात्र दसरा आणि नवरात्रीच्या मिरवणुकीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, तीन हल्लेखो होते, असे सकृतदर्शनी दिसत आहे. त्यापैकी दोन हल्लेखोरांना अटक झाली आहे, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. आता पोलिसांना हत्येचा कट कुणी रचला, हे शोधावे लागेल. हा कट कुणी, केव्हा आणि कोणत्या उद्देशासाठी रचला? हे शोधणे महत्त्वाचे असणार आहे. माझा अनुभव असा आहे की, कट रचणारे कधीच पुढे येत नाहीत. ते आपल्या हस्तकाद्वारे काम करून घेतात. जसे की, २६/११ चा हल्ला का केला जात आहे? हे हल्लेखोरांपैकी अतिशय मोजक्यांना माहीत होते. बाकीच्यांना फक्त माणसे मारण्याचे आदेश दिले होते. त्यापलीकडे त्यांना काहीच माहीत नव्हते.

बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणात आधी धमकी दिली गेली. त्यामुळे धमकी आणि हत्येचा काही संबंध आहे का? हे तपासावे लागेल. माझ्या अनुभवाप्रमाणे ज्यावेळी अशी धमकी देऊन हत्या केली जाते, तेव्हा गुन्हेगारी जगतामध्ये आपला वर्चस्व वाढला पाहीजे, अशी काही लोकांची अपेक्षा असते, असेही उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात केले जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर रुग्णालयात जाऊन बाबा सिद्दीकी यांचा मुलगा, आमदार झिशान सिद्दीकी याचे सांत्वन केले.