अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना निवडणूक आयोगाने मागील शनिवारी केवळ शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर सोमवारी उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह आयोगाने मंजूर केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह मंजूर केलं. मात्र या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपाच्या मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली.

नक्की वाचा >> Andheri Bypoll: …म्हणून भाजपाकडे उमेदवार मागे घेण्यासाठी, बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली नाही; उद्धव ठाकरेंचा खुलासा

सोमवारी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने या ठिकाणी मशाल चिन्हावर लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असं असतानाच आता शिवसेनेच्या मूळ निवडणूक चिन्हाबद्दल पुन्हा चर्चा सुरु आहे. सध्या दिलेली निवडणूक चिन्हं किती काळ दोन्ही गटांना वापरावी लागतील? आगामी काळातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्हासहीत लढावं लागणार का? असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहेत. अशातच वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रश्नासंदर्भात भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> पुणे तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार! पाकलमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; म्हणाले, “पालिकेत भाजपाची सत्ता असूनही…”

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांची निवडणूक चिन्हं या विषयावर आपलं मत मांडलं. दोन्ही गटांना देण्यात आलेली चिन्हं जरी अंधेरी पोटनिवडणुकीपुरती असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही हीच चिन्हं वापरावी लागू शकतात अशी शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे. असं झाल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा फटका मानला जाईल.

नक्की वाचा >> संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…”

“निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना जे चिन्हांचं वाटप केलं होतं ते फक्त अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपुरतं मर्यादित होतं. जर समजा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर लागल्या तर मग मात्र निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागेल की सध्या आहे ते चिन्ह त्यांना द्यावं की ‘धनुष्यबाण’ चिन्ह द्यावं. अर्थात निवडणूक आयोगाचा हा निर्णय त्यांच्यासमोर निवडणूक चिन्हावरुन सुरु असणाऱ्या सुनावणीवर अवलंबून आहे. ही सुनावणी जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आगोदर संपली तर तो वाद तिथे मिटू शकतो. मात्र ही सुनावणी प्रलंबित राहिली तर माझ्यामते ही चिन्हं त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वापरावी लागतील असं आज तरी दिसत आहे,” असं निकम यांनी म्हटलं आहे.