मुंबई : वळीवाच्या सरींनी आणि वादळवाऱ्याच्या तडाख्याने सोमवारी दुपारच्या सुमारास मुंबई महानगराला झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमधील रेल्वे पोलीस पेट्रोल पंपाजवळील जाहिरातीचा लोखंडी फलक कोसळला. ही जागा रेल्वे पोलिसांची असल्याचे मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच रेल्वे पोलिसांनी ही जागा त्यांची असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी व तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या आदेशान्वये या पेट्रोल पंपाच्याजवळ जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण निधी संस्थेमार्फत व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पूर्वपरवानगीने घाटकोपरमधील पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पोलिसांच्या मालकीच्या असलेल्या जागेत डिसेंबर २०२१ पासून बीपीसीएल कंपनीचे पोलीस फ्युल स्टेशन सुरू होता. या पेट्रोल पंपाच्याजवळ आयपीएस अधिकारी व तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या मंजुरी आदेशान्वये इगो मीडिया प्रा. लि. या जाहिरात कंपनीस भाडेतत्वावर १० वर्षाच्या कालावधीसाठी जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. वरील दोन्ही उपक्रम लोहमार्ग पोलीस कल्याण निधी संस्थेमार्फत राबविण्यात येत होते.

हेही वाचा…घाटकोपर होर्डिंगच्या मालकावर बलात्काराचाही गुन्हा; अवैध कृत्यांची मोठी पार्श्वभूमी

मुंबईत सोमवारी दुपारी ४.१० च्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि काही भागात मुसळधार पाऊसही कोसळू लागला. घाटकोपर परिसरात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे अनेकजण या पेट्रोल पंप परिसरातील कॅनॉपी खाली उभे होते. तसेच पेट्रोल भरण्यासाठी अनेक वाहने पंपावर आली होती. त्यावेळी अचानक पेट्रोल पंपालगत असलेला १२० बाय १२० चौरस फुटांचा महाकाय लोखंडी जाहिरात फलक पंपावर कोसळला. त्यामुळे वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी भरण्याकरिता आलेले आणि पेट्रोल पंपाच्या कॅनॉपी खाली थांबलेले नागरिक जाहिरात फलक व कॅनॉपीच्या खाली दबले गेले.

पालिकेचा दावा रेल्वे पोलिसांनी फेटाळला

रस्त्यावरील झाडे रासायनिक प्रक्रिया करून सुकविल्याप्रकरणी आलेल्या तक्रारींची दखल घेत मागील आठवड्यात महापालिकेने जाहिरातदारास फलक काढून टाकण्याबाबत कारवाई करण्यासाठी पाठवलेले पत्र कार्यालयास प्राप्त झाले होते. याप्रकरणी कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र तत्पूर्वीच ही गंभीर घटना घडली. महापालिकेने दंड आकारल्याच्या नोटीसबाबतच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही, असे लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) शहाजी निकम यांनी सांगितले.

हेही वाचा…घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, १४ लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणारे भावेश भिंडे बेपत्ता

जागा कोणाची यावरून वादंग

बेकायदा जाहिरात फलक उभा असलेली जागा आणि फलक कोणाचा यावरून वाद सुरू झाला. फलक पडल्यानंतर काही कालावधीत मुंबई महापालिकेने संबंधित जागा महापालिकेची नसल्याचे जाहीर केले. तसेच महापालिकेने मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेकडे बोट दाखविले. तर, हा फलक रेल्वेच्या जमिनीवर नाही. तसेच त्याचा भारतीय रेल्वेशी संबंध नाही, असा दावा मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आला आहे. ही जागा रेल्वे पोलिसांची असल्याचे मध्य रेल्वेतील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र आता महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने ही जागा रेल्वे पोलिसांचीच असल्याचा दावा केला आहे. लोहमार्ग पोलीस वसाहतीच्या हद्दीत हे फलक असून महाराष्ट्र राज्य पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या नावे जागा आहे, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा…गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराचा पुढाकार, आता विकासकांना गुणवत्ता हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र सादर करावे लागणार

घाटकोपर बेकायदा जाहिरात प्रकरणात रेल्वे पोलीसही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. रेल्वे पोलिसांनी परवानगी देऊन भाडे घेतल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे. पालिका ४० बाय ४० चौरस फूट जाहिरात फलक लावण्याची परवानगी देते. मात्र, या फलकाचा आकार १२० बाय १२० चौरस फूट होता. या घटनेमुळे आता मुंबईत सद्यस्थितीत असलेल्या सर्व जाहिरात फलकावर सुरक्षा ऑडिट करावे, अशीही मागणी गलगली यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertisement board collapse in ghatkopar mumbai police and railway authorities dispute ownership as investigation begins mumbai print news psg
Show comments