मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार,बोळिंज गृहप्रकल्पातील २२७८ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आकाशवाणी, उपनगरी रेल्वेगाडय़ा आणि फलाटांवर जाहिरात करण्याचे निश्चित केले आहे. येत्या तीन-चार दिवसांत या जाहिराती ऐकायला आणि पाहायला मिळतील. कोकण मंडळाचा सुमारे दहा हजार घरांचा सर्वात मोठा प्रकल्प विरार, बोळिंजमध्ये असून या प्रकल्पातील २२७८ घरे विकलीच जात नसल्याचे चित्र आहे. या प्रकल्पात पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याने ही घरे विक्रीवाचून पडून आहेत.

या घरांसाठी तीनपेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही ही घरे विकली न गेल्याने मंडळाची चिंता वाढली असून आर्थिक नुकसानही होताना दिसत आहे. दरम्यान मे महिन्याच्या सोडतीत विरार, बोळिंजमधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील काहीच घरे विकली गेली असून आजही २२७८ घरे विकली जाणे बाकी आहे.तर सध्या सोडतपूर्व प्रक्रिया सुरू असलेल्या ५३११ घरांच्या सोडतीतही या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कोकण मंडळाने ७ नोव्हेंबरची सोडत आता १३ डिसेंबरला काढण्याचा निर्णय घेत अर्जविक्री-स्वीकृतीला एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.तर दुसरीकडे विरार, बोळिंज घरे विकण्यासाठी या घरांची विविध माध्यमातून जाहिरात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली.

या निर्णयानुसार विरार, बोळिंजच्या घरांच्या जाहिराती लोकलमध्ये लावल्या जाणार आहेत. तर वसई, विरार रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाहिरातीचे मोठे फलक लावले जाणार आहेत. याशिवाय आकाशवाणीवरूनही विरार,बोळिंजसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांची जाहिरात केली जाणार आहे.  विरारमधील प्रसिद्ध अशा जीवदानी मंदिर येथे आणि विरार, बोळिंज प्रकल्पस्थळी स्टॉल उभारत घरांची माहितीचे आणि जाहिरातीच्या पत्रकांचे वाटप येणाऱ्या-जाणाऱ्यांना केले जाणार आहे. मे महिन्याच्या सोडतीदरम्यानही मंडळाने विरारमध्ये घरांच्या जाहिराती केल्या होत्या.मात्र त्यानंतरही घरे विकली गेली नव्हती. परंतु आता लवकरच येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्यांवरील सेवा पूर्ववत; दोन धावपट्ट्यांवरील देखभालीचे काम पूर्ण

सूर्याच्या पाण्याची प्रतीक्षाच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा जून-जुलैमध्येच पूर्ण झाला आहे. हा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यास वसई-विरारचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याअनुषंगाने विरार,बोळिंजचाही पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. त्यामुळे कोकण मंडळाचे आणि वसई-विरारवासीयांचे लक्ष सूर्याच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाकडे लागले आहे. असे असताना या लोकार्पणाची प्रतीक्षा वाढतानाच दिसत आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून त्यांची वेळ घेतली जात असल्याचे ‘एमएमआरडीए’कडून सांगितले जात होते.

Story img Loader