मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकलमधील प्रवासात अचानक कर्णकर्कश आवाजातील जाहिरातींमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अचानक मोठ्या आवाजात मसाले, बँकांच्या जाहिरातींमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत प्रवासी समाज माध्यमावर तक्रारी करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास वेगवान, आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा वाढविण्यात येत आहेत. प्रवाशांना पुढील रेल्वे स्थानकाची माहिती देण्यासाठी आणि प्रवासीभिमुख सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लोकलमध्ये उद्घोषणा करण्यात येते. या उद्घोषणांसह जाहिराती ऐकविल्या जातात. परंतु, या जाहिरातीमुळे प्रवासी हैराण होऊ लागले आहेत. बहुतांश प्रवासी भल्या पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत प्रवास करतात. भल्या पहाटे किंवा मध्यरात्री अचानक मसाल्याची जाहिरात केली जाते. तसेच सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवास गर्दीतून होतो. असे असताना कर्कश्य जाहिरातीमुळे हा प्रवास आणखीन संतापजनक होतो.

गेल्या काही आठवड्यांपासून सीएसएमटी ते कल्याण, कसारा, खोपोली या मार्गावरील लोकलमधील उद्घोषणेद्वारे मसाल्याची जाहिरात वारंवार आणि मोठ्या आवाजात केली जात आहे. ही जाहिरात प्रत्येक स्थानकादरम्यान २ ते ३ वेळा ऐकावी लागते. ही जाहिरात अत्यंत उच्च आवाजात असल्याने प्रवासी हैराण होत आहेत.. गर्दीच्या वेळी आधीच शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवत असतो. त्यात सततचा आणि मोठ्या आवाजातील त्रास अजूनच अस्वस्थ करतो. यामुळे प्रवाशांना वाचन, संभाषण किंवा प्रवासादरम्यान थोडा वेळ विश्रांती घेणेही शक्य होत नाही, असे प्रवासी मनिष मोरे यांनी सांगितले.

रेल्वेचे तिकीट, मासिक पास काढून प्रवास करतो. यावेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास होणे आवश्यक आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या लोकलमधील जाहिरातींमुळे प्रचंड त्रास होतो. या मोठ्या आवाजातील जाहिराती जबरदस्तीने ऐकाव्या लागत आहेत. याबाबत मध्य रेल्वेने काही तरी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याआधीही चित्रपट, मालिकांच्या जाहिराती, केंद्राच्या विविध योजनांची माहिती ऐकवली जात होती. आता मसाल्याच्या जाहिरातीने तिकीटधारकांचा लोकल प्रवास असह्य होऊ लागला आहे. कर्कश्य आवाजातील जाहिराती तत्काळ बंद कराव्यात किंवा आवाजाची तीव्रता कमी करावी. तसेच प्रत्येक स्थानकादरम्यान जाहिरातींची वारंवारता कमी करणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. दरम्यान, याप्रकरणी लक्ष घालण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले.