गिरगावच्या गिचमीड गर्दीत आणि गजबजाटात आंबेवाडी आपला आब राखून उभी आहे. यंदाचे गणेशोत्सवाचे शंभरावे वर्ष असल्यामुळे आंबेवाडीला जणू मोहरच फुटला आहे. सध्याच्या व्यापारीकरणाच्या काळातही आंबेवाडी श्री गणेशोत्सव मंडळ एकही जाहिरात न घेता ‘श्रीं’चा उत्सव साजरा करते. सगळा खर्च वर्गणीच्या रूपाने स्थानिक राहिवासी भरून काढतात. शंभर वर्षांची परंपरा पुढे नेत असताना जाहिरातींच्या भपकेबाज मोहाला बळी पडलो नाही याचा इथल्या रहिवाशांना अभिमानच वाटतो.
गेल्या चार पिढय़ा श्रींच्या मूर्तीत कसलाही बदल झालेला नाही. हीसुद्धा आंबेवाडी गणेशोत्सवाची एक खासियत आहे. दरवर्षी दोन ते अडीच फुटांची मूर्ती बसविण्यात येते. ती सुबक, छोटी मूर्ती भाविकांच्या मनात भरते हे मात्र खरे. शताद्बी उत्सावाच्या निमित्ताने आंबेवाडी गणोशोत्सव मंडळाने महालाचा देखावा मांडला आहे. अनेक सुशोभित खांबांमुळे मंडप सुंदर दिसतो. प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या तसबिरी लक्ष वेधून घेतात.
आंबेवाडी श्रीगणेशोत्सव मंडळाने अनेक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आखले आहेत आणि त्यांना रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे मंडळाचे साहाय्यक चिटणीस अजय कुलकर्णी यांनी सांगितले. स्थानिकांनी बसवलेले कार्यक्रम, नाटक आणि वाद्यवृंद अशी सांस्कृतिक रेलचेल सध्या आंबेवाडीत सुरू आहे. वर्षभरात गरजू विद्यार्थीना वह्य़ा- पुस्तके पाटप केले जाते. आंबेवाडीतल्या सात चाळी म्हणजे ‘सात सहेलियां खडी खडी’ असे वाटते. प्रत्येक चाळ इंग्रजी आद्याक्षराने ओळखली जाते. एकूण २४० कुटुंबे इथे कैक पिढय़ा राहात आहेत. गणेशोत्सवाच्या काळात आंबेवाडीत उत्साहाचे वातावरण असते. अनेक कवी, लेखक, कलावंतांचे आंबेवाडीशी जवळचे नाते आहे. ज्येष्ठ कवी गुरुनाथ सामंत, कवयित्री रजनी परुळेकर, ‘भटाला दिली ओसरी’मुळे गाजलेल्या कै. मंदाकिनी भडभडे आणि त्यांच्या कन्या, ख्यातनाम अभिनेत्री रिमा, विलास-क्षमा राज हे कलावंत दांपत्य, ज्येष्ठ मेटल क्राफ्ट कलावंत मनीष वाघधरे ही काही नावे. सुप्रसिद्ध डॉक्टर निखिल सोहनीदेखील याच वाडीतीलील रहिवासी.

Story img Loader