लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनो रेलच्या माध्यमातून तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायाद्वारे महसूल मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून चेंबूर – जेकब सर्कल मोनो रेल मार्गिकेवर धावणाऱ्या मोनो रेल गाड्यांच्या आत – बाहेर जाहिराती झळकविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (एमएमएमओसीएल) माध्यमातून मंगळवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता येत्या काही महिन्यात मोनो रेल गाड्यांच्या आत आणि बाहेर विविध प्रकारच्या जाहिराती झळकताना दिसणार आहेत.

रेल्वे, बस वा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोहचू शकत नसलेल्या मुंबईच्या भागात सार्वजिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मोनो रेल प्रकल्प हाती घेतला. मात्र काही कारणांमुळे या प्रकल्पातील केवळ चेंबूर – जेकब सर्कल ही एकमेव मार्गिका बांधून पूर्ण झाली आणि तिचे संचलन सुरू करण्यात आले. तसेच इतर मार्गिका रद्द करण्यात आल्या. त्यामुळे चेंबूर – जेकब सर्कल ही मुंबईतीलच नव्हे तर देशातील एकमेव मोनो रेल मार्गिका आहे. २०.२१ किमी लांबीची ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासूनच तोट्यात आहे. प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आणि मोनो रेलची एकमेव मार्गिका असल्याने या मार्गिकेतून उत्पन्न मिळण्याऐवजी एमएमआरडीएला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे.

आणखी वाचा-Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून एकाला अटक

दरम्यान, मोनो रेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न एमएमआरडीएकडून सुरू आहेत. तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायाद्वारे महसुलात कशी वाढ होऊ शकेल याचा विचार सुरू आहे. यातूनच आता मोनो रेल गाड्यांच्या आत आणि बाहेर विविध कंपन्या, उत्पदनांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास परवानगी देऊन महसूल मिळविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

मोनो रेल मार्गिकेच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या एमएमएमओसीएलने मोनो रेलवर जाहिरात झळकविण्याच्या अधिकाराचे परवाने देण्यासाठी मंगळवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मोनो रेलच्या आत आणि बाहेर जाहिरात झळकविण्याचे अधिकार नियुक्ती करण्यात येणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविण्यास सुरुवात करण्यात आली असून इच्छुक कंपन्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर मोनो रेल गाड्याच्या आत आणि बाहेर जाहिराती झळकविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.