मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम ‘एकट्याच्या मर्जी’पेक्षा अन्य ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सुकाणू समितीतील नेत्यांना विश्वासात घेऊन सामूहिक जबाबदारीने व्हावे, अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्यास नकार देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवितानाच ‘एकला चलो रे’ची भूमिका न घेण्याची अपेक्षाही पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांची नुकतीच नवी दिल्लीत बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा झालेला दारूण पराभव आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाली.

भाजप संविधान बदलणार, मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद, कांद्याचे दर आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमकपणे खोटा प्रचार केल्याचा राज्यात फटका बसला. राज्यातील नेत्यांनी जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला नाही आणि समाज माध्यमांमधील टीका व प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले गेले नाही. निवडणूक काळात विविध जबाबदाऱ्या सांभाळण्याचे व निर्णय घेण्याचे काम एकट्या नेत्याकडून आपल्या मर्जीनुसार करण्याची पद्धत योग्य नाही. ज्येष्ठ नेते व प्रदेश सुकाणू समितीतील नेत्यांना विश्वासात घेऊन ही जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. फडणवीस यांना सरकारमधील जबाबदारीतून मोकळे करण्यास नकार देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवितानाच सर्वांना विश्वासात घेण्याची सूचना त्यांना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागावाटपावर लगेचच चर्चा सुरू करा व जागावाटप लवकर अंतिम करा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

हेही वाचा >>>कोकण रेल्वेच्या टप्पा दुहेरीकरणाला वेग, प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द

मुंबईत शनिवारी बैठक

मित्रपक्षांना बरोबर घेत सरकार चालविण्याचे कसब फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ विधानसभा निवडणुकीचे नियोजन करावे आणि त्यावर पक्षातील अन्य नेत्यांशी सल्लामसलत करावी, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे. त्यामुळे शनिवारी मुंबईत सुकाणू समितीची बैठक होणार आहे. त्यात भूपेंद्र यादव व अश्विन वैष्णव नवीन प्रभारींना या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अन्य नेत्यांनी निष्क्रिय राहून चालणार नाही. फडणवीस काम करतात, म्हणजे महाराष्ट्र ही काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही. त्यात अन्य नेत्यांनी आपले प्रयत्न वाढविले तर महाराष्ट्रात विधानसभा जिंकण्यापासून आपल्याला कुणीही थांबवू शकणार नाही, असेही अमित शहा यांनी बजाविल्याचे सूत्राने सांगितले.