एनसीबीने मॉडेल मुनमुन धमेचाच्या (Munmun Dhamecha) सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीत मुनमुनचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी वेगळाच दावा केलाय. यावेळी त्यांनी एनसीबीच्या शोध मोहिमेत मुनमुनकडे काहीही सापडलं नाही. रोलिंग पेपर सौम्या सिंग या आरोपीकडे सापडल्याचा दावा केलाय. केवळ संशयितांना अटक करायची असेल तर मग तिथं उपस्थित सर्व १३०० लोकांना अटक करायला हवी होती, असं म्हणत खान यांनी एनसीबीवर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वकील अली खान म्हणाले, “मुनमुन एक मॉडेल आहे. तिला क्रुझवर निमंत्रण देण्यात आलं होतं. तिने जहाजावर प्रवेश केला आणि लगेच पुढील २-३ मिनिटात तिच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे तेव्हा त्या रूममध्ये इतर दोन लोक होते. पंचनामा पाहिला तर हे लगेच लक्षात येईल. मी एनसीबीच्याच नोंदीचा उल्लेख करतो आहे. त्याप्रमाणे तेथे सौम्या सिंग आणि बलदेव हे होते. मात्र, त्यांना अटक करण्यात आलेलं नाही. शोध मोहिम राबवण्यात आली तेव्हा मुनमुनकडे काहीही सापडलं नाही. मात्र, सौम्या सिंगकडे रोलिंग पेपर सापडला.”

“…तर मग त्यांनी सर्व १३०० लोकांना अटक करायला हवी”

“मुनमुन धमेचाकडे काहीही सापडलं नाही, सौम्याकडे रोलिंग पेपर सापडला. त्यामुळे हे सर्व प्रकरण सौम्याविरोधात आहे. मुनमुनवरील आरोप हे इतरांवरील आरोपांची कॉपी-पेस्ट आहे. या प्रकरणात एनसीबीने संशयितांना अटक केली असं म्हटलं तर मग त्यांनी सर्व १३०० लोकांना अटक करायला हवी होती. मुनमुन मध्य प्रदेशची नाही. तिथं तिचे कुणीही ओळखीचे नाहीत. तिच्या मार्फत एनसीबीने कुणालाही अटक केलेली नाही. ज्या सौम्याच्या बॅगमधून एनसीबीला काही वस्तू सापडल्या तिला मुनमुन ओळखतही नाही,” असं अली खान म्हणाले.

हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला आजही जामीन नाहीच, उद्या पुन्हा होणार सुनावणी

“एनसीबीने व्हॉट्सअॅप चॅट न्यायालयासमोर ठेवावी”

“मुनमुनकडे एनसीबीला काहीही सापडलेलं नाही. त्यांनी वैद्यकीय चाचणी केली असती तर त्यातही त्यांना मुनमुनच्या शरीरात काहीही सापडलं नसतं. तिने कधीही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. एनसीबीने कमी प्रमाणात ड्रग्ज सापडलेल्या प्रकरणांना मोठ्या हुशारीने मध्यम आणि मोठ्या प्रमाणातील ड्रग्ज जप्तीच्या आरोपांसोबत एकत्र केलंय. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही. एनसीबीने व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे आरोप करत आहे, तर त्यांनी ती चॅट न्यायालयात ठेवावी,” असंही खान यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate of munmun dhamecha comment on ncb claim of drugs in sanitary pad pbs