शैलजा तिवले
मुंबई : मे महिन्याची सुरुवात होताच रक्ताचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली असून थॅलेसेमियाच्या बालकांची रक्तासाठीची परवड सुरू झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून रक्ताचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत होता. परंतु यावर आवश्यक उपाययोजना न झाल्यामुळे मे महिना सुरू होताच हा तुटवडा अधिकच वाढला आहे. रक्त नाही म्हणून अगदी भिंवडीची मुलेही माघारी परतली आहेत. मागील काही दिवसांपासून रक्त उपलब्ध करण्याची विनंती करणारे अनेक पालकांचे फोन यायला सुरुवात झाली आहे. अगदी सात-आठ वर्षांच्या मुलांनाही आपल्याला रक्त मिळेल ना याची काळजी लागलेली असते, असे थॅलेसेमिया रुग्ण आणि बालकांना रक्त मिळविण्यासाठी मदत करणारा मकरंद सुर्वे यांने सांगितले.
डोंबिवली येथे राहणारा १३ वर्षांचा परशुराम आणि त्याची नऊ वर्षांची बहीण यांना थॅलेसेमिया असून दर १५ दिवसांनी त्यांना रक्त चढवावे लागते. ते ३१ मे रोजी रक्त चढविण्यासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात गेले होते. परंतु रक्तच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माघारी जावे लागले. आता पुन्हा ६ मे रोजी त्यांना बोलावण्यात आले आहे. ‘माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी गेलो होतो. मी साफसफाईची कामे करतो. मुलांना रुग्णालयात घेऊन जायचे म्हणजे एक दिवस सुट्टी घ्यावी लागते. त्या दिवसाचा पगार तर जातोच, परंतु मुलांचे हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे तीही प्रवासाने फार थकून जातात. मागील १५ दिवसांपूर्वीही रक्त उपलब्ध नव्हते. त्यावेळी जे. जे. महानगरच्या पेढीतून आम्ही रक्त आणले होते. परंतु यावेळी तेथेही रक्त उपलब्ध नव्हते,’’ असे परशुरामचे वडील नागा बंतल यांनी सांगितले. मानखुर्दला राहणाऱ्या १७ वर्षांच्या श्रद्धानेही अशाच प्रकारे आपली व्यथा मांडली.
मे महिन्यात सुट्टी असल्यामुळे अनेकजण मुंबईबाहेर जातात. तसेच या काळात महाविद्यालयेही बंद असतात. त्यामुळे दरवर्षी या काळात रक्ताचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवतो. यासंदर्भातील वृत्त ‘मे महिन्यात रक्ताची चणचण? ’’ या मथळय़ाखाली ‘लोकसत्ता’’ने १९ एप्रिलला प्रसिद्ध केले होते.
दाते उपलब्ध, परंतु रक्तपेढय़ांच्या वेळांची अडचण
थॅलेसेमियाच्या बालकांना मे महिन्यात अडचण येणार असल्याची माहीत असूनही यासाठीच्या आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. या बालकांना रक्त देण्यासाठीचे दाते आमच्याकडे आहेत. लो. टिळक रुग्णालयातील रक्तपेढी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असते. याशिवाय शनिवारी दुपारी १२ पर्यंतच ती खुली असते, तर रविवारी बंद असते. या वेळांमध्ये कामावर जाणाऱ्या व्यक्तींना रक्त दान करण्यास येणे शक्य नसते. रक्तदानाची वेळ संध्याकाळ ७ पर्यंत ठेवावी. शनिवारी बराच काळ सुरू ठेवल्यास किंवा रविवारी काही तास सुरू ठेवल्यास दात्यांना रक्तदान करण्यास येणे सोईचे जाईल. यासंबंधी आम्ही अनेकदा पेढीशी संपर्क साधून वेळा बदलण्याची मागणी केली आहे. परंतु याला प्रतिसाद मिळालेला नाही, असे सामाजिक कार्यकर्ते किशोर सातपुते यांनी सांगितले.
आपल्या रुग्णांसाठी आवश्यक रक्त उपलब्ध करणे ही त्या त्या रुग्णालयाची जबाबदारी आहे. रुग्णालये रक्त उपलब्ध करू शकले नाहीत, तर अन्य ठिकाणांहून त्यांना ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच रुग्णालयाची आहे. यासाठी आवश्यक तेवढी शिबिरे आयोजित करावी, असे पत्रकाद्वारे कळविले आहे. दरवर्षी या काळात रक्ताचा तुटवडा भासतो. गेल्या वर्षांच्या तुलनेत यावर्षी स्थिती बरी आहे. रक्तपेढीच्या वेळा वाढविण्यासंबधीच्या सूचनाही आम्ही रक्तपेढय़ांना आधीही दिलेल्या आहेत. पुन्हा या सूचना दिल्या जातील. – डॉ. अरुण थोरात, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष

Story img Loader