मुंबई महानगराबरोबरच राज्यातील बहुतांश मोठय़ा शहरांमधील घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘प्रत्येकाला परवडणारे घर’ देण्याची नवी संकल्पना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी मांडली. तसेच याबाबतचे ठोस आणि नेमके धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
शुक्रवारी मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेती, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक अशा सर्वच क्षेत्रात राज्य देशात सतत आघाडीवर राहिले असल्याचे सांगत गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच सुनियोजित नागरिकरण,उद्योगांचा समातोल विकास, शिक्षणाच्या दर्जात वाढ, कोरडवाहू शेती शाश्वत करणे ही विकासाची पंचसूत्री असून टंचाई निवरणासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे यापुढे दुष्काळ आला तरी राज्यात टंचाई जाणवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या पाच वर्षांत राज्यातील प्रत्येक सुविधा ऑलनाईन करण्यासाठी ‘ऑनलाईन महाराष्ट्र’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर
केले. स्वच्छ, गतीमान आणि पारदर्शक प्रशासनाचे वचन पूर्ण केले असून लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असा दावाही त्यांनी शेवटी केला.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, महापौर सुनील प्रभू, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया उपस्थित होते. तर मुंबई उपनगर जिल्ह्य़ातील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उच्च न्यायालयात ध्वजारोहण
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती मोहीत शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सत्वशीला चव्हाण, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एस.जे. वाजिफदार, न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे, न्यायमूर्ती एन.एम. जामदार तसेच उच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्ती  उपस्थित होते.
विधानभवन येथे ध्वजारोहण
 विधानभवन येथे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते व विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

Story img Loader