मुंबईः भारतात बेकायदेशीररित्या १७ वर्ष वास्तव्याला असलेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हबीबुल्ला प्रांग हा अफगाण नागरिक आपली ओळख लपवून भारतात राहात होता. न्यायालयाने त्याला ११ महिन्यांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. यानंतर त्याला परत अफगाणिस्तानात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वडाळा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या अफगाणी नागरिकाला गुन्हे शाखेने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली होती. हबीबुल्लाह प्रांग ऊर्फ जहीर अली खान असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे सापडली होती. गेल्या १७ वर्षांपासून हबीबुल्लाह मुंबईत वास्तव्यास असून त्याने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत.
वडाळा परिसरात काही अफगाणी नागरिक बेकायदेशीपणे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ च्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक धन:श्याम नायर, सदानंद येरेकर, सुनीता भोर, अजित गोंधळी यांच्या पथकाने परिसरात कारवाई करून बहुबुल्लाहला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पोलिसांना त्याच्याकडे जहीर नावाचे पॅनकार्ड आणि वाहनचालक परवाना सापडला. तो भारतीय नागरिक असल्याचे सांगत होता. मात्र तो चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आपण अफगाणी नागरिक असल्याची कबुली दिली. तसेच मुंबईत २००७ पासून वास्तव्यास असल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अफगाणी पॅनकार्ड, अफगाणी नागरिक असल्याचे ओळखपत्र, व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्र जप्त केले. याप्रकरणी महादंडाधिकारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असून ११ महिन्यांची कैद व आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच त्याला मायदेशी पाठवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.