उत्तर भारतात खराब हवामान असल्यामुळे हवेमध्ये दाट धुक्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. याचा परिणाम विमान सेवेवर झालेला पाहायला मिळाला. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून उड्डाण घेणारी अनेक विमाने उशीराने उड्डाण घेत आहेत. अशातच इंडिगोच्या एका विमानाला १३ तास उशीर झाल्यानंतर एका प्रवाशाने थेट वैमानिकावरच हल्ला केल्याचीही एक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर प्रवाशावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंडिगोच्याच एका विमानाला सुमारे १२ तास उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी विमानाच्या बाजूला जमिनीवर बैठक मारून जेवण केले.
इंडिगोचे 6E2195 हे विमान रविवारी गोव्याहून दुपारी २.२५ वाजता उड्डाण घेणे अपेक्षित होते. मात्र काही तास उशीराने उड्डाण घेतल्यानंतर विमानाला रात्री ११.४० वाजता मुंबईत उतरविले गेले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी स्टेपलॅडरला विमानाशी जोडून प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली. तसेच विमान कंपनीने टर्मिनल १ ला प्रवाशांना नेण्यासाठी बसची व्यवस्था केली. बसमध्ये प्रवाशांना जेवणाची पाकिटे ठेवण्यात आले होते. मात्र प्रवाशांनी टर्मिनल १ ला जायला नकार दिला. अनपेक्षित थांब्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांनी विमान ताबडतोब दिल्लीला नेण्याची मागणी केली. काही प्रवाशांनी बसमधील जेवणाचे पाकिट घेऊन विमानाच्या शेजारीच डांबरी रनवेवर बैठक मारून जेवायला घेतले.
प्रवाशांच्या या कृतीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) त्याठिकाणी बोलावले. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रवाशांना गराडा घालून त्यांना सुरक्षा पुरविली. अखरे सोमवारी पहाटे २.३९ वाजता विमान दिल्लीला रवाना झाले.
या प्रकारानंतर इंडिगोचे प्रवक्त्यांनी म्हटले की, १४ जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्र. 6E2195 मधील प्रकार आम्हाला समजला. दिल्लीमध्ये दाट धुके असल्यामुळे विमानाला अचानक मुंबईत उतरविण्यात आले होते. आम्ही प्रवाशांची मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच यापुढील काळात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.
दिल्लीमध्ये दाट धुके असल्यामुळे राजधानीतून मुंबईत येणारी विमाने उशीराने येत आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाच्या जवळपास सर्व विमानांना विलंब झाल्याचे, लाईव्ह एअर ट्राफिक देखरेख संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.
१४ जानेवारी रोजी इंडिगोच्या दिल्लीतून गोव्यात जाणाऱ्या 6E 2175 या विमानाला उड्डाण घेण्यास उशीर झाल्यानंतर संतापलेल्या प्रवाशाने थेट वैमानिकालाच मारहाण केली. विमान उड्डाणाला १३ तास उशीर झाल्याने सर्व प्रवासी संतापले होते. त्यातील एका प्रवाशाने चक्क वैमानिकावर हात उगारला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून इंडिगो विमानाविरोधातील तक्रारीतही वाढ झाली आहे. दरम्यान, वैमानिकावर हात उगारणाऱ्या प्रवाशाविरोधात तक्रार दाखल करून अटक करण्यात आले होते. त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इंडिगो विमानातील कॅप्टन फ्लाईट १३ तास उशिरा असल्याची माहिती देत होता. त्याचदरम्यान, तिथे असलेल्या एका प्रवाशाने पायलटला ठोसा मारला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.