तब्बल २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर सरकारने पुन्हा एकदा एक रूपये मुल्याच्या कागदी नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये लवकरच एक रुपये मुल्याच्या नोटांची छपाई करणार असल्याचे म्हटले आहे. नवीन नोटा चलनात येणार असल्या तरी एक रूपयाच्या जुन्या नोटांचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. ९.७ बाय ६.६ सेंटिमिटर आकारात या नोटांची छपाई करण्यात येणार असून, त्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. मात्र, या अशोक स्तंभावर ‘सत्यमेव जयते’ या अक्षरांची छपाई करणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे. एक रुपयाच्या या नोटांमध्ये एका बाजूस गुलाबी-हिरवा असा मिश्र रंगछटेचा वापर करण्यात येणार असून, नोटेची दुसरी बाजू अगदी विरुद्ध रंगांनी तयार होईल. सुरक्षेच्या दृष्टीने मध्यभागी देण्यात येणारी विशिष्ट संख्या आणि हिंदी भाषेतील ‘भारत’ हा शब्द सामान्य दृष्टीस नजरेस पडणार नाही अशा पध्दतीने छापण्यात येईल. सामान्यत: भारतीय चलनी नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची स्वाक्षरी पाहायला मिळते, परंतू या नोटेवर वित्त सचिव राजीव मेहऋषी यांची दोन भाषांमध्ये स्वाक्षरी असेल. १९९४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात छपाईचा वाढता खर्च लक्षात घेत अधिक मुल्याच्या नोटांची मोठ्या प्रमाणावर छपाई करण्याच्या उद्देशाने एक रूपयांच्या नोटा छापण्याचे थांबविण्यात आले होते. त्यानंतर १९९५ मध्ये अशाच कारणांमुळे दोन आणि पाच रूपयांच्या नोटांची छपाईदेखील सरकारने थांबविली होती. तेव्हापासून आजतागयात सरकारकडून एक रुपयाच्या नोटांऐवजी त्या मुल्याच्या नाण्यांचीच निर्मिती करण्यात येत आहे. सरकारकडून १०, २०, ५०, १०० ,५०० आणि १००० रूपये मुल्यांच्या नोटा छापल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा