महा-मेगाब्लॉकनंतर सीएसटीजवळ लाल सिग्नल ओलांडल्याने वाहतुकीचा खोळंबा
हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी एमआरव्हीसी आणि रेल्वेने घेतलेला ७२ तासांचा महा-मेगाब्लॉक मुकाटपणे सहन करणाऱ्या प्रवाशांना मोटरमनच्या चुकीचा फटका सोमवारी सकाळी बसला.
हार्बर मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येणाऱ्या लोकलने लाल सिग्नल ओलांडल्याने या ठिकाणची संलग्न इशारा प्रणाली (ऑक्झिलरी वॉìनग सिस्टीम) कार्यरत झाली. याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी असलेली लोकल वांद्रय़ाच्या दिशेला जाण्यास निघाली होती. मात्र समोरून येणाऱ्या गाडीला योग्य वेळी ब्रेक लागल्याने मोठा अपघात टळला. पण या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीचा चांगलाच खेळखंडोबा झाला. त्यातच संतप्त प्रवाशांनी चेंबूर येथे आंदोलन केल्याने दिरंगाईत भर पडली. अखेर हार्बर मार्गावरील सहा फेऱ्या रद्द, तर १० फेऱ्यांना फटका बसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
हार्बर मार्गावरील ७२ तासांचा महा-मेगाब्लॉक यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळच्या वेळेत वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली. मात्र अंधेरीहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणारी गाडी सकाळी साडेसातच्या सुमारास सीएसटी यार्डमध्ये आली. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनमध्ये शिरणे अपेक्षित होते. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर वांद्रे लोकल उभी असल्याने या गाडीला सीएसटी यार्डातच लाल सिग्नल देण्यात आला. मात्र हा सिग्नल न बघता मोटरमनने गाडी पुढे दामटवली. याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील गाडीही वांद्रय़ाच्या दिशेने निघाली. पण मुंबईकडे येणाऱ्या गाडीने लाल सिग्नल ओलांडल्यावर संलग्न इशारा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने ही गाडी जागीच थांबली आणि अपघात टळला. मात्र त्यानंतर ही गाडी पुन्हा मागे घेऊन वांद्रे लोकल रवाना करण्यास वेळ लागला. साधारण ८.०५च्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र तब्बल अर्धा तास हा मार्ग बंद असल्याने हार्बर मार्गावरील सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावण्यास सुरुवात झाली. या घटनेला जबाबदार असलेल्या मोटरमनचे निलंबन करण्यात आले आहे.
चेंबूर येथे प्रवाशांचे आंदोलन
या घटनेमुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने चेंबूर येथील प्रवाशांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. येथे प्रवाशांनी ९.४०च्या सुमाराला रेल्वे रोको करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. अखेर अध्र्या तासानंतर हे आंदोलन शमले. त्यानंतर गाडय़ा सुरू झाल्या. मात्र या आंदोलनामुळे आणि सकाळच्या सिग्नल ओलांडण्याच्या घटनेमुळे हार्बर मार्गावरील सेवा तब्बल ४० ते ४५ मिनिटे उशिराने सुरू होत्या.