अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवला आहे. पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्यावतीने याबद्दल पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेकडून विविध माहितीपत्रके आणि जाहिराती प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती दिली जाते. पण सर्व पत्रके, जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर केला जात नाही.

केंद्र शासनाच्या सूत्रानुसार, राज्याची भाषा वापरणेही बंधनकारक आहे. परंतु पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. माहितीपत्रके, जाहिरातील तसेच सोशल मीडियावर मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने दिला आहे.

मनसेच्या आंदोलनानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर
मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी अधिकच आक्रमक होत, राज्यभरातील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडण्याचा सपाटा सुरू केला होता.

Story img Loader