मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपीने कपडे बदल्याची बाब उघडकीस आली आहे. सैफ याच्या घरातून बाहेर पडताना व वांद्रे लकी हॉटेल येथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात निदर्शनास आलेल्या आरोपीने कपडे बदलल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके मुंबईसह इतर ठिकाणी फिरत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी २० पथके तैनात करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
सैफ अली खानच्या इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असतानाही आरोपी इमारतीत कसा शिरला असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. आरोपीने सैफ अली खानवर हल्ला केला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मास्क व टोपी होती. पण इमारतीतून खाली उतरताना त्याने चेहऱ्यावरील मास्क व टोपी का काढली असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. आरोपीने पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी कपडेही बदलले. सुरूवातीला सैफच्या घरातून बाहेर पडताना आरोपीने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. पण त्यानंतर त्याने कपडे बदलल्याचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर बराच काळ आरोपी वांद्रे परिसरातच फिरत होता. त्यावेळी त्याने कपडे बदलून आकाशी रंगाचा शर्ट परिधान केला. वांद्रे येथील लकी हॉटेलजवळी सीसी टीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आकाशी रंगाचे शर्ट घाऊन जात असताना दिसत आहे. तो वांद्रे स्थानकाजवळ गेल्याचा पोलिसांना संशय़ आहे.
हेही वाचा…गोवंडी, मानखुर्दमधील अनधिकृत मोबाइल टॉवरविरोधात मनसे आक्रमक
सैफ, करीना दोघेही गुरूवारी रात्री आवाज झाल्यानंतर धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीच्या दिशेने धावले. त्यावेळी सैफ करीनाच्या पुढे होता. त्याने आरोपीला ‘तुम्हे क्या चाहिये’ असे विचारले. पण आरोपीने ब्लेडसारख्या दिसणाऱ्या वस्तूने सैफवर हल्ला केला. त्यावेळी तैमुरची आया गीता या देखील मध्ये पडल्या. त्यावेळी जवळच दागिनेही होते. पण त्यातील काहीही चोरीला गेले नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याशिवाय जहांगिरची नर्स एलियामा फिलिप्स ऊर्फ लिमा हिने आरोपीने एक कोटी रुपये मागितल्याचा दावा केला होता. इतरही व्यक्तींकडून या दाव्याची पडताळणी करण्यात आली असून त्यांनीही आरोपीने तशी मागणी केल्याचे सांगितले.
हेही वाचा…प्रवाशांची बॅग तपासणाऱ्या पोलिसांवर करडी नजर
हल्ल्याच्या वेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते. सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत चोर शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा सैफच्या लहान मुलाला घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी सीसी टीव्हीतून आरोपीची ओळख पटली असून तो सराईत असल्याचे वाटत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हेशाखाही समांतर तपास करीत आहे.