मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता मुंबई पोलिसांच्या संरक्षण व सुरक्षा विभागाने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत फेरआढावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पोलीस सुरक्षा रक्षकांनी त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. यावेळी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. त्यात नव्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. अनेक वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षारक्षकांच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्याच सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षारक्षकाने अतिमत्त्वाच्या व्यक्तीसोबतच राहणे आवश्यक आहे. काही वेळा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षारक्षकांना दुसऱ्या मोटरगाडीत बसवून प्रवास करतात. तसेच अचानक एखाद्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतात. सुरक्षारक्षकाने त्यांच्या सूचना ऐकल्या नाहीत तर त्यांची तक्रार करून बदली करण्याची मागणी करण्यात येते, असे सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा…त्यागावरून त्रागा; अमित शहा यांच्या कथित विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर कोणत्याही परिस्थिती सुरक्षारक्षकांना नियमावलीचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
हे ही वाचा…मविआ सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांवर गदा; ‘रिपोर्ट कार्ड’च्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा आरोप
बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेमध्ये काही चूक झाली होती का ? याचीही तपासणी सुरू आहे. तसेच सिद्दिकी यांची हत्या, तसेच आगामी काळातील निवडणुका या पार्श्वभूमीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेरआढावा घेण्याचे काम सुरू आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना करण्यात आल्या आहेत.