महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख असणारे बॅनर्स मुंबईतील घाटकोपरमध्ये झळकल्याने मागील महिन्यात राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. मात्र नंतर या प्रकरणावरुन मनसेने पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारची बॅनरबाजी न करण्याचे आदेश दिले. असं असलं तरी आता या प्रकरणावरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता खरे हिंदुहृदयसम्राट हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचं मत मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलंय.
नक्की पाहा >> Video: : विधानसभेत फडणवीसांच्या भाषणादरम्यान गिरीश महाजनांना लागली डुलकी
थेट नाव न घेता मनसेवर टीका…
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने अणुशक्तीनगर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अणुशक्तीनगरमधील विधानसभा वॉर्डमधील कार्यकर्ता संमेलनासाठी नितेश राणेही उपस्थित होते. यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट मनसेचं नाव न घेता हिंदुहृदयसम्राट या बॅनरबाजीवरुन टीका केली. त्याचप्रमाणे त्यांनी फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी देता येईल असंही मत व्यक्त केलं.
नक्की वाचा >> दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”
“माझ्या मते फडणवीस यांना…”
“काही लोक स्वत: हिंदुहृदयसम्राट असल्याचे बॅनर्स लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली तर हिंदुहृदयसम्राट ही पदवी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कोणाला द्यायची असेल तर ती माननीय देवेंद्र फडणवीस यांना द्यावी असं माझं म्हणणं आहे,” असं नितेश राणे यांनी भाषणामध्ये म्हटले. नितेश राणेंचे हे शब्द ऐकतानाच भाजपाच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून या वाक्याचं समर्थन केलं.
नक्की वाचा >> “अनिल देशमुख हिंदू, मराठा असल्याने लगेच राजीनामा पण नवाब मलिक मुस्लीम…”; नितेश राणेंचा पवारांना सवाल
राज यांनी खडसावले
मागील महिन्यामध्ये घाटकोपरमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपरबरोबरच, चेंबूर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे मोठे बॅनर्स लावले होते. त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण राज यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी, “आपल्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट हा उल्लेख करून नका”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले होते.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबत मनसैनिकांना आदेश जारी करण्यात आले होते. “महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (म्हणजे ‘मराठी हृदयसम्राट’ व्यतिरिक्त) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. तसेच या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावं”, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं होतं.