बेस्टच्या वाहतूक विभागापाठोपाठ मोनो रेलच्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा पवित्रा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो रेलचे १९८ कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपाबाबत अद्याप मोनो रेल प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. तर १९८ कर्मचारी संपावर गेल्याने मोनो रेल सध्या प्रशिक्षणार्थी तरुणांकडून चालवून घेतली जात असल्याची माहिती मोनो रेलमधील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकसत्ता ऑनलाइनला दिली.

वेतनवाढ, एमएमआरडीची वेतनश्रेणी द्यावी किंवा एमएमआरडीएच्या कंत्राट वेतनश्रेणीवर घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मोनो रेलचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशाराही दिला होता.  मागच्या साडे पाच वर्षांपासून एकदाही पगारवाढ मिळालेली नाही असे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

स्कॉमी कंपनी मोनो रेल चालवत असताना कायमस्वरुपी कर्मचारी असल्यामुळे नोकरीची हमी होती. पण आता एक वर्षाचे कंत्राट आहे. त्यामुळे नोकरीवरुन कमी केली जाण्याची भीती मोनो रेल कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीने डिसेंबर महिन्याच्या वेतनाचे धनादेश काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मोनो रेल कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे एमएमआरडीएने म्हटले होते.  कर्मचारी संपावर गेल्यास मोनो रेलची सेवाही कोलमडण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे संपावर गेलात तर शिस्तभंगाची कारवाई करु असा इशारा एमएमआरडीने दिला होता.  बेशिस्तपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही, असेही एमएमआरडीएने म्हटले आहे.

मात्र, एमएमआरडीएच्या इशाऱ्यानंतरही मोनो रेलचे कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून संपावर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून मोनो रेल चालवली जात असल्याचा आरोप संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. प्रशिक्षणार्थ कर्मचाऱ्यांकडे मोनो रेल चालवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सुद्धा नसून हा एक प्रकारे प्रवाशांचे प्राण धोक्यात घालण्याचा प्रकार आहे असे या संपावर गेलेले कर्मचारी सांगतात. गेल्या महिन्यापासून एमएमआरडीने मोनो रेलचे संचालन स्वत:च्या हातात घेतले. त्याआधी स्कॉमी ही मलेशियन कंपनी मोनो रेल चालवत होती.

 

Story img Loader