पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडूनही या कृत्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. एनआयएने आतापर्यंत १०० हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. जे राष्ट्रविरोधी काम करतील त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पीएफआयवरील कारवायांबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, देश विघातक घटकांना मुळापासून उखडून टाकण्याचं काम आमच्या सरकारकडून केलं जाईल. महाराष्ट्रात किंवा देशात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा अधिकार कुणालाही नाही. असं कृत्य सहनही केलं जाणार नाही. या प्रकरणी सरकार पूर्णपणे गंभीर आहे. जे देशविरोधी काम करतील त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल, असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा- “थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
दरम्यान, त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली आहे. मागील काही काळापासून राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया प्रलंबित होती. पण आमचं शिवसेना-भाजपा युतीच सरकार आल्यानंतर आम्ही पोलीस भरती प्रक्रिया जलद गतीने सुरू करणार आहोत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.