मुंबई : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर आता बीए, बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या सीईटीचे प्रश्न व उत्तरतालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर विद्यार्थ्यांना ३१ मेपर्यंत संकेतस्थळावर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बीए, बीएस्सी बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मे रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आली होती. बीए, बीएस्सी बीएड या परीक्षेसाठी राज्यभरातून २ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीन आयडीवर २९ मेपासून उपलब्ध करून दिली आहे. लाॅगिन आयडीवरील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि उत्तरतालिका यांच्याबाबत विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ते ३१ मेपर्यंत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन आक्षेप घेऊ शकतील.

हेही वाचा – ८० ते ९० जागा देण्याचा भाजपचा शब्द ; वादानंतर छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा – मुंबई : रमाबाई आंबेडकर नगरचे सर्वेक्षण पूर्ण

प्रत्येक आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना १००० रुपये भरावे लागणार आहेत. बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आक्षेप नोंदवण्याची संधी प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे नोंदवण्यात आलेले आक्षेप, निवेदन किंवा तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे सीईटी कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी सांगितले.

Story img Loader