मुंबई : सकाळी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले, मात्र रात्री घरी आलेच नाहीत. त्यातच दुपारपासून फोन बंद होता. त्यामुळे चिंतीत वाकचौरे कुटुंबियांनी दीपक यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातच एलिफंटा लेणी येथे झालेल्या अपघाताची माहिती कळताच कुटुंबियांनी कुलाबा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. मात्र तेथून काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, गुरुवारी पहाटे ३.३० वाजता घरातील भ्रमणध्वनी वाजला आणि वाकचौरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
गोवंडी येथे प्लबिंगचे काम करीत असलेले दीपक वाकचौरे (४४) दररोज त्यांच्या मुलीला चेंबूर येथील आचार्य अत्रे महाविद्यालयात सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला जात असत. मात्र बुधवारी दुपारी बाबा महाविद्यालयात नेण्यास न आल्याने त्यांची मुलगी तन्वी (१७) एकटीच घरी आली. घरी आल्यावर तिने बाबांना भ्रमणध्वनी केला, पण तो लागत नव्हता. दीपक वाकचौरे यांना फिरायची आवड असल्याने ते नेहमी मित्रांसोबत कुठे ना कुठे जात असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काही मित्रांशी संपर्क साधला, मात्र सर्वच मित्रांनी ते आपल्या सोबत नसल्याचे तन्वीला सांगितले. त्यानंतर तन्वी शिकवणीला निघून गेली. सायंकाळी घरी आल्यानंतरही तिने पुन्हा बाबांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लागत नव्हता. त्यामुळे नेरूळ येथील त्यांच्या मित्राला दूरध्वनी केला. पण ते तेथेही नव्हते. त्याचदरम्यान दूरचित्रवाणीवर घारापुरी येथे अपघात झाल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. दीपक वाकचौरे यांना फिरण्याची आवड असल्याने ते घारापुरीला गेले असावेत, असा संशय त्यांच्या कुटुंबियांना आला. त्यामुळे रात्री ९ च्यादरम्यान त्यांचे नातेवाईक व परिसरातील मित्रांनी कुलाबा पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली. मात्र तशी कोणतीही व्यक्ती अद्याप तरी सापडली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ते पुन्हा घरी परतले. मात्र गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांच्या कुटुंबियांना कुलाबा पोलीस ठाण्यातून दूरध्वनी आला. एक मृतदेह सापडला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी येण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर वाकचौरे कुटुंबिय कुलाबा पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांना दीपक यांचा मृत्यू झाल्याचे कळले. हे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
दीपक वाकचौरे हे गोवंडीतील न्यूमाेनिया बाग येथे राहत असून, त्यांच्यासोबत पत्नी वनिता, तन्वी (१७), सचिन (१२), आई आणि दोन भाऊ असे एकत्रित राहत होते. सकाळी मुलगी तन्वी ही महाविद्यालयात सोडल्यानंतर ते कोणालाच न सांगता दुचाकी घेऊन गेट वे ऑफ इंडियाला पोहोचते. त्यांची दुचाकी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात सापडल्याची माहिती दीपक यांचे मामा दिलीप गांगुर्डे यांनी दिली.