मुंबई : करोनाकाळानंतर राज्यातील ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावल्याचे पुन्हा समोर आले आहे. सोपी गणिते, मराठी-इंग्रजीचे वाचन यामध्ये विद्यार्थी प्रचंड मागे असल्याचे ‘असर’च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या ‘ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) सर्वेक्षणातून राज्याच्या शिक्षणाची दैना समोर आली आहे. करोनाकाळापूर्वी झालेल्या (२०१८) सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेत किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे. शाळांतील पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली आहे. करोना काळात विद्यार्थी शाळांपासून दुरावले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर झाल्याचे दिसून येते आहे. विशेषत धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, ठाणे या जिल्ह्यांतील गुणवत्ता सर्वाधिक खालावल्याचे असर अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मराठी वाचनाची क्षमता घटली
साधारण दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणे अपेक्षित आहे. त्यानुसार ‘एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले’ अशा स्वरूपाचा परिच्छेद वाचण्यासाठी देण्यात आला. मात्र पाचवीतील साधारण ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत.
वजाबाकी, भागाकाराशी फारकत
पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा (उदा. ४१ वजा १३) करण्यास सांगण्यात आले. मात्र अशा स्वरूपाचे गणित अवघ्य १९.६ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात (२०१८) हे प्रमाण ३०.२ टक्के होते. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. (उदा. ५१९ भागिले चार) मात्र अशा स्वरूपाचे गणित सोडवू शकणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ४०.७ टक्क्यांवरून ३४.६ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
इंग्रजी वाचनाचाही बोऱ्या
What is the time? / This is a large house./ I like to read. अशी वाक्ये पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना वाचण्यास देण्यात आली होती. ही वाक्ये वाचू शकणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण २३.५ टक्के आणि आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ४९.२ टक्के होते. आठवीतील ५ टक्के तर पाचवीतील १० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी कॅपिटल अक्षरेही ओळखता आली नाहीत.
शिकवण्यांचा वाढता सोस
गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातही खासगी शिकवण्यांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे. पहिली ते आठवीचे शासकीय शाळांत शिकणाऱ्या १२.५ टक्के तर खासगी शाळांतील २१ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शिकवण्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
पायाभूत सुविधा घटल्या
राज्यात करोनापूर्व शैक्षणिक वर्षांपूर्वीच्या तुलनेत शाळांमधील पायाभूत सुविधांचे प्रमाण घटले आहे. राज्यातील २० टक्के शाळांमध्ये नळ आहेत, पण पिण्याचे पाणी नाही, ३२.१ टक्के शाळांमध्ये वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे नाहीत. ४७ टक्के शाळांमध्ये संगणक नाहीत.
शाळाबाह्य विद्यार्थी घटले..
करोना काळात शाळाबाह्य विद्यार्थी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शाळा नियमित सुरू होताच विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर शाळांकडे वळल्याचे दिसते. २०२२ मधील सर्वेक्षणानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी झाल्याचे दिसते. खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील पट वाढला आहे. शैक्षणिक दर्जाही खासगी शाळांमध्ये अधिक खालावल्याचे दिसते.
असे होते सर्वेक्षण
प्रथम फाउंडेशनच्या वतीने देशभरातील शालेय शिक्षणाच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात येते.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांतील आवश्यक क्षमता आत्मसात केल्या आहेत का, याची पाहणी करण्यात येते. या सर्वेक्षणात करोना काळात खंड पडला होता. २०१८-१९नंतर यंदा २०२२-२३ या वर्षांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.