मुख्यमंत्री निवासस्थानी धरणे आंदोलनाचा प्रयत्नही पोलिसांनी हाणून पाडला
हाजीअली दग्र्यामध्ये महिलांना प्रवेशास मनाई असलेल्या ‘मझार’ पर्यंत जाण्याचा हट्ट धरल्याने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी आणि आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी रोखले. दग्र्यात जाण्यात अपयश आल्याने चिडलेल्या देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानासमोर धरणे धरण्याचा प्रयत्न सुरु केल्याने पोलिसांनी तोही हाणून पाडला. त्यामुळे शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर येथील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी असलेले र्निबध मोडून काढण्यात यशस्वी ठरलेल्या देसाई यांना हाजीअली दर्गा येथे मात्र र्निबध झुगारण्यात यश मिळू शकले नाही.
महिलांनाही समानतेची वागणूक मिळावी आणि प्रार्थनास्थळांमध्ये त्यांचा प्रवेश रोखला जाऊ नये, अशी भूमिका घेतलेल्या देसाई यांनी हाजीअली दर्गा येथे जाऊन महिलांसाठी असलेले र्निबध झुगारण्याची भूमिका जाहीर केली, तेव्हाच मुस्लिमांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे देसाई या दग्र्यामध्ये प्रवेश करण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास येण्यापूर्वीच मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर जमा झाले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. देसाई दग्र्याच्या ठिकाणी आल्या, तेव्हा विरोधकांनी जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली व रस्ता अडविला. तेव्हा पोलिसांनी देसाई यांना गाडीतून उतरण्यास मज्जाव करुन दूर अंतरावर नेले. सर्वाना प्रवेश दिला जातो, त्या जागेपर्यंत जाऊ देण्याची पोलिसांची तयारी होती. पण देसाई यांनी ‘मझार’ पर्यंत जाण्याचा हट्ट धरला, असे पोलिस सह आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. तो मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यांना तेथे जाऊ न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलासा
तृप्ती देसाई यांच्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात ‘विशेष प्रवेश’ आयोजनाद्वारे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का होऊ दिला, असा सवाल करत स्थानिक न्यायालयाने केला होता. तसेच न्यायालयात हजर राहून त्याचा खुलासा करण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते. उच्च न्यायालयाने गुरूवारी या आदेशाला स्थगिती देत दोघांनाही दिलासा दिला आहे.