पदापर्णातच काँग्रेसला नेस्तनाबूत करत दिल्ली हलवून सोडणाऱ्या आम आदमी पार्टीचे पुढील ‘लक्ष्य’ मुंबई असणार आहे. आगामी लोकसभा तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सर्वच्या सर्व जागा लढविण्याची तयारी असल्याचे ‘आप’चे नेते मयांक गांधी यांनी सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय पुढील आठवडय़ात दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत होईल, असेही ते म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना अनपेक्षितपणे मिळालेल्या यशानंतर मुंबईतील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. गेल्या काही काळात अण्णा हजारे व केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. दिल्ली निवडणुकीत आपले नाव वापरू नये असे अण्णांनी केजरीवाल यांना सांगितले होते. मात्र दिल्लीतील यशानंतर अण्णांनी केजरीवाल यांचे अभिनंदनही केले होते. महाराष्ट्र ही अण्णांची कर्मभूमी असून येथे त्यांचे सहकार्य मिळाल्यास राज्यात आम आदमी पार्टीला चांगले यश मिळेल, असा विश्वास ‘आप’चे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
या पाश्र्वभूमीवर मयांक गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभेच्या जागा लढविण्याबाबतची भूमिका पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच निश्चित केली जाईल. तथापि मुंबईत व राज्यात आम आदमी पार्टीकडे मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते असल्यामुळे  मोठय़ा प्रमाणावर जागा लढता येतील, असेही त्यांनी सांगितले.
वाढती महागाई, भ्रष्टाचार तसेच निष्क्रिय विरोध पक्ष या पाश्र्वभूमीवर ‘आप’ला मिळालेल्या यशाचा विचार करावा लागेल. विरोधी पक्षांनीही केलेल्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. मुंबईतील कमी होत चाललेल्या मोकळ्या जागा, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, वाहतुकीसह नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा लक्षात
घेऊन विकासाला प्राधान्य देत निवडणुकीच्या रिंगणात उतरू असेही त्यांनी सांगितले.
व्यक्तिकेंद्री की विकेंद्रीकरण?
भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या दिशेने ‘आम आदमी’चे पहिले पाऊल- विजय पांढरे
पहिल्याच फटक्यात ‘आप’ची छाप!

Story img Loader