गेले काही महिने दहशत पसरविणाऱ्या डेंग्यूचे रुग्ण पावसाळा संपल्यावर कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र पालिका रुग्णालयातील डेंग्यू रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवडय़ांएवढीच आहे. तर काविळीच्या रुग्णसंख्येत मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईस आता डेंग्यूबरोबरच काविळीनेही वेढल्याचे स्पष्ट होत आहे.
पालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, सहा ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूच्या ३७ रुग्णांची नोंद करण्यात आली. १३ ऑक्टोबरपर्यंत ८२, तर २२ ऑक्टोबर रोजी महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यू रुग्णांची संख्या १२० झाली. ऑक्टोबर अखेर त्यात आणखी ३७ रुग्णांची भर पडली.
दरम्यान, पहिल्या पंधरवडय़ातील काविळीच्या ६७ रुग्णांच्या तुलनेत चौथ्या आठवडय़ात ४० काविळ रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहराला काविळीनेही विळखा घातल्याचे स्पष्ट होत आहे.