मुंबई : धुळवड खेळून घरी परतलेल्या घाटकोपरमधील शाह दाम्पत्याचे बुधवारी राहत्या घरात मृतदेह आढळून आले होते. मात्र चार दिवसानंतरही या दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा कसून तपास करीत असून व्हिसेरा तपासणी अहवालानंतरच मृत्युचे कारण उघड होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या दोघांच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.
घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरामधील उच्चभ्रू वस्तीतील ‘कुकरेजा’ टॉवरमध्ये दीपक शाह (४२) आणि टीना शाह (३९) दाम्पत्य वास्तव्यास होते. कपड्याचे व्यापारी असलेल्या दीपक यांचा काही वर्षापूर्वी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी बंगलोर येथे राहणाऱ्या टिना यांच्याशी विवाह केला होता. तेव्हापासून ते ‘कुकरेजा’ टॉवरमध्ये राहत होते.
हेही वाचा >>> लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू
मंगळवारी धुळवड खेळण्यासाठी ते काही मित्रांच्या घरी गेले होते. ते रात्री उशीरा घरी परतले. मात्र बुधवारी दिवसभर त्यांनी त्यांचा दरवाजा उघडला नव्हता. त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला याबाबत संशय आल्याने तिने ही बाब इमारतीमधील काही रहिवाशांना सांगितली. त्यांनी पंतनगर पोलिसांशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी बनावट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. यावेळी शाह दाम्पत्य स्वछतागृहात बेशुद्धावस्थेत आढळले.
पंतनगर पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्युचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, दोघांच्याही रक्ताचे नमुने आणि काही अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अहवाल लवकरच मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ‘परिमंडळ ७’चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.