लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : धारावी पुनर्विकासाचे गुपचूप भूमिपूजन केल्याने अदानी समूह, धारावी रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) विरोधात धारावीकरांमध्ये रोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय धारावी बचाव आंदोलनाने घेतला आहे. त्यानुसार आठवड्याभरात धारावी बचाव आंदोलनाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याबाबतच निर्णय धारावी बचाव आंदोलनाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

अदानी समुहाच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्यास धारावीकरांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. त्याचवेळी ३५० ऐवजी ५०० चौरस फुटांच्या घराची धारावीकरांनी मागणी केली आहे. राज्य सरकार वा धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतिम आराखड्यासही अद्याप मान्यता मिळालेली नाही. असे असताना बेकायदेशीररित्या, लपूनछपून अदानी समूहाने, डीआरपीपीएलने गुरुवार, १२ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या जागेवरील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाचा आहे. दरम्यान, भूमिपूजनाचा सोहळा उधळण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाने ११ सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा धसका घेत गुरुवारचे भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे डीआरपीने अधिकृतपणे पोलिसांना कळविले होते. त्यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर धारावी बचाव आंदोलनाने आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले होते. मात्र उपोषण मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, गुरूवारी सकाळी १०.३० वाजता डीआरपीपीएलने गुपचूप भूमिपूजन केले. यासंबंधीची अधिकृत घोषणाही केली.

आणखी वाचा-जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पुनर्निविदा

डीआरपीपीएलच्या कृतीवर धारावीकरांनी जोरदार टीका केली आहे. लपूनछपून भूमिपूजन का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून आता अदानी आणि डीआरपीपीएलविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय धारावी बचाव आंदोलनाने घेतला आहे. गणेशोत्सवानंतर धारावीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाकडून देण्यात आली. शुक्रवारी एक बैठक आयोजित करून त्यात आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. धारावीकरच नव्हे तर मुलुंड, कुर्ल्यासह ज्या ज्या मुंबईकरांचा अदानीला विरोध आहे त्या सर्वांना एकत्र करून लवकरच एक मोर्चा काढण्यात येईल, असेही धारावी बचाव आंदोलनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ganeshotsav dharavi resident will on streets against adani mumbai print news mrj