शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सांत्वन करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आज (शनिवार) दुपारी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राणे यांचे पुत्र नितेश राणे हेदेखिल उपस्थित होते. दरम्यान, राणे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना देखिल भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसवासी झालेल्या नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणात त्यांना भेटण्याची इच्छा एका टिव्ही कार्यक्रमाद्वारे बोलून दाखवली होती. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्‍यावेळी नारायण राणे भारतात नव्‍हते. आता बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे उद्धव त्‍यांना वेळ देतात का, याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader