रस्त्यांच्या कामात होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र दस्तुरखुद्द महापौरांनीच पालिका आयुक्तांना पाठविले असतानाच प्रशासनाने वांद्रे-खार परिसरातील तीन रस्त्यांच्या दुरुस्तीच्या २३.६५ कोटी रुपयांच्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला. काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या गोंधळाचा फायदा घेत मनसे आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांना बोलण्याची संधी नाकारत स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजूर करून टाकला. रस्ते बांधणी करताना वाहून नेण्यात येणाऱ्या रॅबीटच्या कामात नालेसफाईप्रमाणेच घोटाळा होत असून त्याच्या चौकशीची मागणी करणारे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठविले आहे. वांद्रे-खार परिसरातील एस. व्ही. रोडपासून लिंकिंग रोडपर्यंतचा सरस्वती रस्ता, के. सी. मार्गापासून अंतिम टोकापर्यंतचा रंगसारदा प्रोमेनेड, लिंकिंग रोडपासून १९ व्या रस्त्यापर्यंतचा १३ वा रस्ता यांच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता.

Story img Loader