मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार असून आता बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. सागरी मंडळाने या सेवेला परवानगी दिली असून आता केवळ बंदर प्राधिकरणाकडून परवानगी मिळणे बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील पंधरा दिवसांत बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… मुंबई : महिन्याभरात भाडे नाकारणाऱ्या २३ हजाराहून अधिक रिक्षा, टॅक्सींवर कारवाई
मुंबई ते मांडवा जलमार्गावर जी २०० प्रवाशी क्षमतेची हायस्पीड बोट धावणार आहे, तीच बोट बेलापूर ते गेट वे आॅफ इंडिया जलमार्गावर चालविली जाणार आहे. त्यामुळे बेलापूर-गेट वे आॅफ इंडिया, मुंबई क्रुझ टर्मिनल ते मांडवा, मांडवा ते मुंबई क्रुझ टर्मिनल आणि गेट वे आॅ फ इंडिया ते बेलापूर अशा दिवसभर या बोटीच्या फेऱ्या होतील. बेलापूर ते गेट वे अशी सकाळी साडे आठला आणि गेट वे ते बेलापूर अशी सायंकाळी साडे सहाला दोन फेऱ्या होणार आहेत. या सेवेमुळे ऐन गर्दीच्या वेळेस बेलापूर ते गेट वे अंतर ६० मिनिटांत पार करता येणार असून त्यासाठी ४००-४५० रुपये मोजावे लागतील.
हेही वाचा… मुंबई: ८५ लाखांचे १७ किलो अमली पदार्थ जप्त
जलद जलप्रवासासाठी बंदर प्राधिकरण आणि सागरी मंडळाने अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सीचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशी सेवा फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली. या सेवेला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही. असे असले तरी वॉटर टॅक्सी सेवेची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारपासून मुंबई क्रुझ टर्मिनल ते मांडवा अशी सेवा सुरू होणार आहे. दिवसभरात मुंबई ते मांडवा अशा सहा फेऱ्या (येणारी-जाणारी) होणार आहेत. ही सेवा सुरू केल्यानंतर आता बेलापूर ते गेटवे जलमार्गावरही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा… मुंबई: नाट्यगृहांमध्ये राजकीय कार्यक्रमांचा शिरकाव
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याची तयारी सुरू आहे. आता केवळ मुंबई बंदर प्राधिकरणाची परवानगी मिळणे शिल्लक आहे. ही परवानगी मिळाली की तात्काळ ही सेवा सुरू करू. – अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई सागरी मंडळ