मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईची हवा सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत असली, तरी शिवाजीनगर – गोवंडी आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’, नेव्ही नगर – कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतीत झाले आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १४९ इतका होता. नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ३१५ इतका होता. तर गोवंडी शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१८, २१३ इतका होता. या केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. अशा हवेत हृदय किंवा फुफ्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जास्त काळ राहू नये. तसेच शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हवेची गुणवत्ता घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे प्रदूषण कारणीभूत नसून मुंबईतील बांधकामांचाही परिणाम यावर होत आहे. अधून मधून मुंबईतील दृश्यमानताही बाधित होत असते. त्यामुळे हवेमध्ये अति सूक्ष्म प्रदूषकांसोबतच तुलनेने मोठ्या आकाराचीही प्रदूषके असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी पीएम २.५ सोबतच पीएम१० चे प्रमाणही वाढलेले होते. बांधकामामधून निर्माण होणारे प्रदूषणही त्यास कारणीभूत आहे.

हेही वाचा…कुर्ला बस अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या आठवर

शिवाजी नगरची हवा सातत्याने ‘वाईट’

शिवाजी नगर येथील हवा गुणवत्तेत ट्रॉम्बे, देवनार, चेंबूर या भागातील हवा गुणवत्तेचाही समावेश असतो. मेट्रो बांधकाम, बायोमेडिकल कचरा विघटनाच्या कंपनीमधून होणारे प्रदूषण, देवनार कचराभूमी, ट्रॉम्बेमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण या सर्व कारणांमुळे शिवाजी नगर येथील हवा सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत नोंदली जाते.

हेही वाचा…लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या, नाशिकमध्ये चार दिवसांत कांद्याच्या दरात किती घसरण झाली

मुंबईची हवा गुणवत्ता सतत खालावत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रामुख्याने लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो. यासाठी प्रत्येक शाळेत मुलांची तपासणी करावी. यातून मुलांना त्रास होतो का हे समजण्यास मदत हेईल आणि त्यानुसार पुढील उपाययोजना करणे सोपे जाईल. भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

Story img Loader