मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईची हवा सोमवारी ‘मध्यम’ श्रेणीत असली, तरी शिवाजीनगर – गोवंडी आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’, नेव्ही नगर – कुलाबा येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर चिंतीत झाले आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी १४९ इतका होता. नेव्ही नगर, कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ३१५ इतका होता. तर गोवंडी शिवाजीनगर आणि मालाड येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २१८, २१३ इतका होता. या केंद्रांवर ‘पीएम २.५’ या प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली. अशा हवेत हृदय किंवा फुफ्फुसांचा आजार असलेल्यांनी, गर्भवती महिला आणि लहान मुलांनी जास्त काळ राहू नये. तसेच शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा