मुंबई : विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी नायर रुग्णालयात ‘प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ आता मंबईत आणखी दोन केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पूर्व उपनगरामध्ये शीव तर पश्चिम उपनगरामध्ये कूपर रुग्णालयामध्ये ही केंद्रे सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष मुलांवर उपचार करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे आव्हानात्मक काम असते. यासाठी विशेष मुलांच्या पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे विशेष गरजा असलेल्या या मुलांना अद्ययावत उपचार सहज उपलब्ध व्हावेत. तसेच त्यांचे एकात्मिक पुनर्वसन हे एकाच छताखाली व्हावे या उद्देशाने नायर रुग्णालयामध्ये नुकतेच प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी आणखी दोन अद्ययावत केंद्र मुंबईमध्ये सुरू करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेला दिल्या होत्या. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करत मुंबई महानगरपालिकेने या केंद्रासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. या केंद्रासाठी पूर्व व पश्चिम उपनगरामध्ये जागा शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पूर्व उपनगरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे शीव रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आणि पश्चिम उपनगरामध्ये कूपर हे वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या रुग्णालयांमध्ये हे केंद्र सुरू करण्याबाबात चाचपणी सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डाॅ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>>वर्षभरात मुंबईत सव्वा लाखांहून अधिक घरांची विक्री

वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यास प्राधान्य

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रामध्ये कान, नाक, घसा विभाग, नेत्रशल्यचिकित्सा विभाग, अस्थिव्यंगचिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, मनोविकृती चिकित्सा विभाग, व्यवसायोपचार स्कूल आणि सेंटर, फिजिओथेरपी स्कूल आणि सेंटर, श्रवणशास्त्र व वाक् विकृतीउपचार विभाग यासारख्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध कराव्या लागतात. त्यामुळे हे केंद्र वैद्यकीय महाविद्यालायत सुरू करण्यास प्राधान्य असेल. त्यामुळे शीव व कूपर रुग्णालयाबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After nair shiv and cooper hospitals also have special rehabilitation centers for children mumbai print news amy
Show comments